काळ्या पैशांचा महापूर, खोकेबाजांकडून 5 कोटी जप्त; उरलेली रोकड गेली कुठे?
निवडणुकीत खोकेबाज, गद्दारांकडून अक्षरशः पैशांचा महापूर सुरू झाला आहे. पुणेनजीक खेड-शिवापूर परिसरात पोलिसांनी सोमवारी एका कारमधून पाच कोटी रुपये जप्त केले. कारचालकासह चौघांची चौकशी केली आणि सोडूनही देण्यात आले. दरम्यान, 5 कोटी जप्त केले तर मग उरलेली रक्कम किती होती? 15 की 25 कोटी? ते पैसे कुठे गेले? हा पैसा कोणाचा होता आणि कुठे जात होता? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. खेड-शिवापूर येथे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी 6.15च्या सुमारास एक अलिशान कार अडवून तपासणी केली असता मोठी रोकड आढळली. चालक आणि कारमध्ये तीनजण होते. कारसह चौघांना पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी करण्यात आली.
5 कोटींची रक्कम आयकर विभागाकडे जमा -पोलीस अधीक्षक
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी या कारवाई संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. संबंधित कारचालक आणि तिघांची चौकशी केली. ही रक्कम एका बांधकाम ठेकेदाराची असल्याचे त्यांनी सांगितले. पाच कोटी रक्कम आढळून आली. ही रक्कम आयकर विभागाकडे जमा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगालाही माहिती देण्यात आली. आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या तपासानंतर याप्रकरणी कारवाईची दिशा ठरविली जाईल, असे पोलीस अधिक्षकांनी सांगितले.
चार गाडय़ा कुठे आहेत? – रोहित पवार
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा आहे. यातील एक गाडी पकडली होती. पण अजून चार गाडय़ा कुठे आहेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. दलालीतून आलेल्या पैशांच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱया खोकेबाजांना जनता ओके करून डोंगर, दऱया बघण्यासाठी कायमची घरी पाठवणार. हा ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱयांनी लक्षात ठेवावे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
5 कोटी जप्त केले; 10 कोटी काय झाडी, काय डोंगर करत पोहोचवण्यात आले – संजय राऊत
खेड-शिवापूर येथे पोलिसांनी दोन गाडय़ांमध्ये 15 कोटींची रक्कम पकडली होती. मात्र, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून पह्न आल्याने 5 कोटी जप्त केल्याचे दाखवत 10 कोटी रुपये काय झाडी, काय डोंगर करत योग्य ठिकाणी पोहोचवण्यात आले, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. याबाबत पोलीस आणि निवडणूक आयोगाची तोंडे बंद केल्याने तेदेखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक जिंकण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या आमदारांना पुन्हा 50 खोके पाठवत आहेत. त्यातील 15 कोटींचा पहिला हप्ता त्यांना पाठवण्यात येत असल्याचे आपण याआधीच सांगितले होते, असे संजय राऊत म्हणाले. या घटनेवरून मिंधे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या गटाकडून कशाप्रकारे पैशांचा वाटप सुरू आहे हे दिसून येते. आता 15 कोटी रुपये पोहोचले आहेत. उरलेली रक्कमही पोलीस संरक्षणात आमदारांपर्यंत पोहोचणार आहे. अशा घटनांकडे निवडणूक आयोग कानाडोळा करत असून, डोळे मिटून बसला आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.
कारमध्ये 5 कोटी आणि कळीचे प्रश्न…
– मोदी सरकार डिजिटल इंडियाचा पुरस्कार करत आहे. क@शलेस व्यवहारांवर जोर देत आहे. मात्र, पुण्यात कारमध्ये 5 कोटी सापडल्याने डिजिटल इंडियाची पोलखोल झाली आहे.
– इतकी मोठी रक्कम कारने कशासाठी नेली जात होती.
– या रकमेची कुठे एंट्री झाली होती? कारने ही रक्कम नेण्याची परवानगी घेतली होती का, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
– ऐन निवडणुकीत ही रक्कम सापडली असून ज्या कंत्राटदाराची ही रक्कम असल्याचे दावे केले जात आहेत त्याला ही रक्कम नेमकी कुणी दिली होती.
– एरव्ही किरकोळ रक्कम नाकाबंदीत सापडली तरी कायद्याचा फास आवळला जातो मग संबधित कारमधून ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांना जुजबी चौकशी करून पोलिसांनी सोडून कसे दिले असा प्रश्नही विचारला जात आहे.
पुन्हा कारमध्ये सापडले घबाड
पुण्यात आणखी एका कारमध्ये मोठे घबाड आज सापडले. नाकाबंदीत हडपसर पोलिसांना एका गाडीत 22 लाख 90 हजार रुपये रोकड सापडली आहे. दौंड होऊन पुणे मार्केट यार्ड या ठिकाणी गाडी जात होती. पोलिसांनी या गाडीची झडती घेतली असता ही रोकड आढळली. पोलिसांनी विचारपूस केली असता ही एका व्यापाऱयाची रोकड असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
कारमधील तिघे शहाजीबापूंचे खास
कारमधील तिघे मिंधे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे खास असल्याचे कळते. त्यातील सागर पाटील बापूंचा नातेवाईक आहे तर रफिक नदाफ कार्यकर्ता आहे. गुवाहाटीत पलायन केले तेव्हा बापूंनी रफिकलाच फोन करून ‘काय झाडी, काय डोंगार, एकदम ओके’ हा डायलॉग झाडला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List