सलमान खानच्या काळवीट शिकारप्रकरणी बिष्णोई समाजाने थेट मोदींकडे केली ही विनंती
बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान सतत त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांची बिष्णोई गँगने गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये सलमान खानचा उल्लेख करण्यात आला होता. तेव्हापासून सलमानची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. काळवीट शिकार प्रकरणापासून सलमानवर बिष्णोई समाज नाराज आहे. ज्या काळवीटाची बिष्णोई समाज पूजा करतो, त्याची शिकार सलमानने ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगदरम्यान केल्याचा आरोप आहे. म्हणूनच सलमानने त्यांच्या मंदिरात जाऊन माफी मागावी अशी बिष्णोई समाजाची मागणी होती. आता या समाजाकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करण्यात आली आहे.
लॉरेन्स बिष्णोई गँगने सलमान खानला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एप्रिल महिन्यात सलमानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर बिष्णोई गँगच्या दोघांकडून गोळीबारसुद्धा करण्यात आला होता. यादरम्यान सलमानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, सलमानने कोणत्याही प्राण्याला मारलं नाही, तर तो माफी कशाची मागणार? तर सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने म्हटलं होतं की सलमाने स्वत: तिला सांगितलं होतं की त्याने काळवीट शिकार केली होती. मात्र त्यावेळी सलमानला ही गोष्ट माहीत नव्हती की बिष्णोई समाजासाठी काळवीट इतका पूजनीय आहे.
या सर्व वादादरम्यान आता बिष्णोई समाजाचे अध्यक्ष देवेंद्र बिष्णोई यांनी ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, “सर्वांत आधी मी हे स्पष्ट करतो की सोमी अली माझ्या संपर्कात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एकाच्या बदल्यात दुसऱ्याने माफी मागावी आणि पूजा करावी याची परवागनी आमचा समाज देत नाही. जो गुन्हा करतो त्यालाच माफी मागावी लागते. त्यालाच पश्चात्ताप करावा लागतो. जोपर्यंत माफीचा प्रश्न आहे, तर आता सलमानच्या वडिलांनीही खोटं म्हटलंय की सलमानने असं काही केलंच नाही. त्यामुळे आता सलमानला माफी मिळणार नाही.”
“तुम्ही खोटं बोलून स्वत:ला वाचवू शकत नाही. सत्य बोलून वाचवलं जाऊ शकतं की चूक झाली आणि माफ करा. बाकी कोर्टात खटला सुरू आहे. आता आम्ही त्याला माफ करणार नाही कारण ही लोकं धादांत खोटं बोलत आहेत. आधी पैशांचा आरोप लावला होता. तो आमचा गुन्हेगार आहे. मी तर पंतप्रधान, गृहमंत्री आणि कायदे मंत्री यांना विनंती करतो की या खटल्याची लवकरात लवकर सुनावणी करून सलमानला शिक्षा द्यावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List