आकाशातून कोसळला 50 किलोचा धातूचा तुकडा, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
नागपूर जिह्यातील उमरेड येथे आकाशातून 50 किलोचा धातूचा तुकडा कोसळला. घराच्या स्लॅबवर चार फूट लांबीचा तुकडा पडल्याने एकच खळबळ माजली. येथील कोसे ले-आऊट परिसरात आकाशातून जड धातूचा पडलेला तुकडा पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली. हा तुकडा उपग्रहाचा असण्याची शक्यता खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी वर्तवली. तुकडा पडला तेव्हा स्फोटासारखा आवाज झाला असे अमेय भास्कर बसेशंकर यांनी सांगितले. त्यांच्याच घराच्या स्लॅबवर हा तुकडा कोसळला.
मोठा आवाज झाल्यामुळे परिसरात घबराट पसरली. हा तुकडा सुमारे 50 किलो वजनाचा असून तो 10 ते 12 मिमी जाडीचा आणि सुमारे 4 फूट लांबीचा आहे. तो अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असल्याने घराच्या स्लॅबचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तुकडा आपल्या घरावर कोसळताच घरमालक अमेय यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळाची तपासणी केल़ा खबरदारी म्हणून पुढील तपासणीसाठी नागपूर फॉरेन्सिक प्रयोगशाळेत हा तुकडा पाठवण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List