‘इस्रो’ची पुन्हा सुपर कामगिरी! स्पेस डॉकिंग करणारा हिंदुस्थान ठरला चौथा देश
हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने पुन्हा एकदा सरस कामगिरी केली आहे. इस्रोने दुसऱ्यांदा दोन उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडले. स्पेस डॉकिंग करणारा हिंदुस्थान हा आता जगात चौथा देश ठरला आहे. री-डॉकिंगच्या यशानंतर येत्या दोन आठवड्यांत अधिक वैज्ञानिक प्रयोग केले जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करून दिली. इस्रोने 30 डिसेंबर 2024 रोजी पीएसएलव्ही सी60 स्पेडेक्स मोहीम यशस्वीरीत्या प्रक्षेपित केली होती, तर उपग्रहांचे पहिले डॉकिंग 16 जानेवारी रोजी केले होते. 13 मार्चला 9 वाजून 20 मिनिटांनी ते यशस्वीरीत्या अनडॉक करण्यात आले. 16 फेब्रुवारीला हिंदुस्थान देश अंतराळात दोन अंतराळयान यशस्वीरीत्या लॉक करणारा चौथा देश ठरला होता. याआधी रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनी अशी कामगिरी केलेली आहे.
हिंदुस्थानला हे यश मिळाल्याने आता हिंदुस्थानचे चांद्रयान-4, गगनयान मोहीम आणि हिंदुस्थान अंतराळ स्थानक या मोहिमेला पाठबळ मिळाले आहे. चांद्रयान-4 मोहिमेत चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. हिंदुस्थानच्या स्पॅडेक्स मोहिमेद्वारे कमी पृथ्वी कक्षेत दोन लहान अंतराळयानांचे डॉकिंग आणि अनडॉकिंग करण्याचे तंत्रज्ञान दाखवणे, तसेच दोन डॉक केलेल्या अंतराळयानामध्ये विद्युत शक्ती हस्तांतरित करण्याचे प्रात्यक्षिक दाखवणे, स्पेस डॉकिंग म्हणजे अवकाशात दोन अवकाशयानांना जोडणे होय. या टेक्नोलॉजीचा वापर आता इस्रोच्या पुढील चांद्रयान-4 मोहिमेत केला जाईल.
मिशनचे फायदे
हे मिशन यशस्वी झाल्यानंतर हिंदुस्थान 2035 मध्ये आपले स्वतःचे अंतराळ स्टेशन बनवेल. अंतराळ स्टेशनमध्ये पाच मॉड्युल असतील. याला एकाच वेळी अंतराळात घेऊन जाण्यात येईल. यातील पहिले मॉड्युल 2028 मध्ये लाँच केले जाण्याची शक्यता आहे. हे मिशन चांद्रयान-4 साठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यशानंतर ‘इस्रो’ने काय म्हटले
अंतराळयानाचे डॉकिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाले! एक ऐतिहासिक क्षण. चला डॉकिंग प्रक्रिया जाणून घेऊ या ः अंतराळयानांमधील अंतर 15 मीटरवरून 3 मीटरपर्यंत कमी करण्यात आले. डॉकिंग अचूकतेने सुरू करण्यात आले, ज्यामुळे अंतराळयान यशस्वीरीत्या पकडता आले. डॉकिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाले. भारत हा यशस्वी अंतराळ डॉकिंग साध्य करणारा चौथा देश ठरला. संपूर्ण टीमचे अभिनंदन! भारताचे अभिनंदन! डॉकिंगनंतर दोन्ही अंतराळयानांचे एकच वस्तू म्हणून नियंत्रण यशस्वी झाले. येत्या काही दिवसांत अनडॉकिंग आणि पॉवर ट्रान्सफर तपासणी केली
जाईल, असे इस्रोने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List