धाड… धाड.. धाड..! किरकोळ वादातून सहकाऱ्यानेच अधिकाऱ्यांसमोरच कॉन्स्टेबलला घातल्या 11 गोळ्या, पोलीस दलात खळबळ
रात्री दहाची वेळ. पोलीस लाईनमधील सर्व कर्मचारी जेवण वगैरे करून आपली नियमित कामांमध्ये व्यस्त होते, तर काही जेवणाची तयारी करत होते. याच दरम्यान दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वादाचा भडका उडतो. काही कळायच्या आत हा शाब्दिक वाद गुद्द्यावर येतो आणि नंतर धाड… धाड.. धाड… अशा एका मागून एक 11 गोळ्या झाडल्याचा आवाज येतो. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू होतो. हा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये घडला आहे.
बिहारच्या बेतिया पोलीस लाईनमध्ये शनिवारी रात्री हा रक्तपात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजित कुमार आणि सोनू कुमार या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद एवढा विकोपाला गेला की सर्वजित याने सोनूवर आपल्या सर्व्हिस रायफलमधून गोळीबार केला. यातील जवळपास 11 गोळ्या लागल्याने सोनूचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सर्वजितला अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच डिआयजी हर किशोर राय आणि एसपींनी सदर ठिकाणी धाव घेतली. सर्वजित कुमार याने सोनू कुमार याच्यावर एकूण 20 गोळ्या झाडल्या. यापैकी 10 ते 11 गोळ्या त्याच्या चेहऱ्याच्या आरपार गेल्या आणि जाग्यावरच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सर्वजितला अटक केली असून जुन्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही पोलीस शिपाई काहीदिवसांपूर्वीच बेतिया पोलीस लाईनला आले होते आणि एकाच युनिटमध्ये कार्यरत होते.
नक्की कारण काय?
सदर गोळीबारामागील कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून हा प्रकार घडला आहे. सोनू कुमार हा सर्वजितच्या पत्नीच्या संपर्कात होता. त्यामुळे सर्वजित याने नाराजी व्यक्त केली होती. अर्थात यास पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही, पोलीस सर्व बाजुने या घटनेची चौकशी करत आहे. पोलीस शिपाई सोनू कुमार हा बिहारच्या भभुआ जिल्ह्यातील रहिवासी होता, तर सर्वजित आरा जिल्ह्यातील होता. लवकरच या हत्याकांडामागील सत्य समोर आणू असे पोलिसांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List