मुलाच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग अन् झाला अपघात, तरुणाचा मृत्यू
अल्पवयीन मुलाचा अट्टहास एका 19 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. बापाकडे हट्ट करून अल्पवयीनाने चक्क रिक्षा चालविण्यास ताब्यात घेतली. त्यानंतर दोघेही मित्र स्वारगेट परिसरात जेवायाला आले होते. जेवण केल्यानंतर अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे रिक्षा चालवून रिलिंगला धडक दिल्यामुळे रिक्षातील 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 15 एप्रिलला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ब्रिजवर घडला आहे. याप्रकरणी रिक्षामालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
रितेश शिवाजी गायकवाड (वय – 19, रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा) रस्ता असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जालिंदर बबन साळुंके (वय – 35, रा. कात्रज) असे गुन्हा दाखल केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलीस अंमलदार विठ्ठल चिपाडे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रिक्षाचालक जालिंदर साळुंके यांनी मुलगा अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही त्याच्या ताब्यात रिक्षा दिली. त्यामुळे वडिलांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तपास करीत आहेत.
पोर्शे चालकाने दोघांना चिरडले होते
अल्पवयीन मुलाने आलिशान पोर्शे वाहन चालवीत दोन अभियंता तरुण-तरुणीचा जीव घेतल्याची घटना कल्याणीनगरमध्ये घडली होती. या प्रकरणात पोलीस, ससून, बालन्याय हक्क मंडळासह विविध यंत्रणांना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांनी ठोस कारवाई केली होती. नऊ महिन्यांपेक्षाही जास्त कालावधीपासून ते कुटुंबीय कारागृहात आहे.
“रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलाच्या ताब्यात वाहन दिले होते. त्यानंतर मुलाने बेदरकापणे रिक्षा चालवून ब्रीजवरील रिलिंगला धडक दिली. त्यामुळे रिक्षातील तरूण खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.”
समीर शेंडे, सहायक पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List