आजपासून माथेरान बेमुदत बंद! पर्यटकांच्या फसवणुकीविरोधात संघर्ष समितीचा एकमुखी निर्धार
उन्हाच्या झळा वाढल्याने थंड होण्यासाठी माथेरानला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर जरा थांबा… कारण माथेरान शहरात उद्या मंगळवारपासून बेमुदत बंद पाळण्यात येणार आहे. दस्तुरी नाक्यावर होणारी पर्यटकांची दिशाभूल आणि आर्थिक फसवणुकीविरोधात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने हे आंदोलन पुकारले आहे. पर्यटकांची होणारी लुबाडणूक रोखण्यास प्रशासन कानाडोळा करत असल्यानेच संघर्ष समितीने हा आवाज दिला असून त्याला हॉटेल इंडस्ट्री, ई-रिक्षा संघटना, व्यापारी, सामाजिक संस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा बंद सुरू राहणार असल्याने एरवी हजारो पर्यटकांमुळे गजबजलेल्या माथेरानमध्ये शुकशुकाट असणार आहे.
निसर्गाने नटलेले, दऱया-खोऱयांत वसलेले आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असल्याने पर्यटकांची पहिली पसंती असलेले थंड हवेचे पर्यटनस्थळ माथेरान रोज हजारो पर्यटकांनी गजबजलेले असते. मुंबई, ठाणे, पुण्यातील पर्यटकांचा मोठा राबता माथेरानमध्ये असतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून माथेरानमध्ये पर्यटकांची लूट होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना फसवून त्यांच्याकडून अवाचेसवा पैसे उकळण्याचा नवा धंदा काही दलालांनी सुरू केला होता. त्यात घोडेवाल्यांचाही समावेश असल्याचा आरोप माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केला आहे.
या आहेत मागण्या
- दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले, हमाल, रूमचे एजंट आणि रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये.
- जागोजागी माहितीचे फलक लावावेत.
- संवेदनशील जागांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत.
पर्यटकांची लूटमार रोखण्यासाठीच…
दस्तुरी नाक्यावरून होणाऱया पर्यटकांच्या लुटमारीचा मोठा फटका माथेरानमधील व्यावसायिकांना बसू लागला होता. ही लूटमार थांबवण्यासाठी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने आवाज उठवला. 27 फेब्रुवारी रोजी संघर्ष समितीने माथेरान नगरपालिकेचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे, वनखाते आणि पोलीस ठाणे यांना निवेदन दिले होते. मात्र 18 दिवस उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले.
आंदोलनावर शिक्कामोर्तब
पर्यटक हाच माथेरानच्या अर्थव्यवस्थेचा गाभा आहे आणि त्याचीच बेसुमार लूट होणार असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा संघर्ष समितीने दिला. आज माथेरान बंदच्या अंतिम निर्णयासाठी संघर्ष समितीची बैठक झाली. यावेळी समितीचे प्रमुख कुलदीप जाधव, मनोज खेडकर, शिवाजी शिंदे, प्रवीण सकपाळ, राजेश चौधरी, प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, हॉटेल इंडस्ट्रीचे उमेश दुबल, ई- रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, चर्मकार समाजाचे अध्यक्ष नितेश कदम, महिला आघाडीच्या संगीता जांभळे, सुहासिनी शिंदे, प्रतिभा घावरे, स्वाती कुमार, सुहासिनी दाभेकर, अंकिता तोरणे, श्रुतिका दाभेकर यांच्यासह पदाधिकारी अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत माथेरान बंदच्या आंदोलनावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे उद्या मंगळपासून माथेरानमधील सर्व व्यावसायिक प्रशासनाविरोधात कडकडीत बेमुदत बंद पाळणार आहेत. या बंदला मोठा पाठिंबा मिळत आहे.
नवीन पर्यटकांना तूर्त नो एण्ट्री
माथेरान पर्यटन बचाव समितीचे अध्यक्ष कुलदीप जाधव यांनी बंदबाबत भूमिका स्पष्ट केली व हा बंद पर्यटकांच्या आणि पर्यटनाच्या हितासाठीच असल्याचे सांगितले.
ज्यांनी हॉटेलचे अॅडव्हान्स बुकिंग केले त्यांचे काय?
- त्या पर्यटकांचे पैसे हॉटेलमालकांनी परत द्यायचे ठरवले आहे. माथेरानमध्ये आता नवीन पर्यटकांना एण्ट्री नाही. जे आज मुक्कामी आहेत त्यांना उद्या-परवा वाहनातून नेरळला पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हातावर पोट असलेल्या विव्रेत्यांचे काय?
- या आंदोलनात रानमेवा विकणाऱया आदिवासींपासून दुकानदार, ई-रिक्षाचालक, टॅक्सी चालक-मालक संघटना आणि हॉटेल इंडस्ट्रीही सहभागी झाली आहे. प्रत्येकाचे पोट पर्यटकांवर अवलंबून आहे. पण आता नाही तर कधीच नाही हा निर्धार सर्वांनी केला आहे.
पर्यटक आले तर काय?
- टॅक्सी चालक-मालक संघटनेने या बंदला पाठिंबा दिल्याने नेरळ येथूनच पर्यटकांना टॅक्सीचालक माथेरानमध्ये आणणार नाहीत. जे पर्यटक खासगी वाहनाने माथेरानकडे येणार आहेत त्यांना नेरळमध्येच रोखले जाईल.
यासाठी आंदोलन
- दस्तुरी नाक्यावरून पर्यटकांना गावात आणण्याऐवजी बळजबरीने वेगवेगळे पॉइंट दाखवून हॉटेलकडे उशिरा सोडण्यात येते. मोठी रक्कम उकळली जाते.
- मिनी ट्रेन बंद असून ई-रिक्षाची सेवा फक्त स्थानिकांना दिली जाते, अशी खोटी माहिती देत घोडेवाले नवख्या पर्यटकांना लुबाडतात.
- हॉटेलच्या रूम दाखवणारे एजंट तसेच हमाल पर्यटकांना लूटत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ.
पर्यटकांची फसवणूक थांबेल… माथेरानचे पर्यटनही वाढेल
पर्यटक आले नाहीत तर माथेरानच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच फटका बसेल. पण पर्यटकांची फसवणूक कायमची थांबवण्यासाठीच हे पाऊल तमाम माथेरानकरांनी उचलले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, मुदत दिली तरीही तोडगा निघत नसेल तर आंदोलन हाच अखेरचा पर्याय आहे, असे माथेरान पर्यटन बचाव समितीचे अध्यक्ष कुलदीप जाधव यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List