गैंग्स ऑफ कल्याण-डोंबिवली : डोंबिवलीत आरक्षित भूखंडावरील बेकायदा इमारतीवर हातोडा, पालिका आयुक्तांच्या तंबीनंतर प्रभाग अधिकाऱ्यांची भागम्भाग
बेकायदा बांधकामांवरून पालिका आयुक्तांनी तंबी देताच प्रभाग अधिकाऱ्यांची चांगलीच भागम्भाग सुरू झाली आहे. पालिकेच्या ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली आज खंबाळपाड्यात आरक्षित भूखंडावरील इमारतीवर हातोडा टाकण्यात आला आहे. उद्यानाच्या जागेवर खुलेआम ही इमारत उभी केली होती. या कारवाईने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
कल्याण-डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारतींच्या प्रश्नावर रान उठले आहे. यावरून नागरिकांनी पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली असून अधिकाऱ्यांच्या पापामुळेच हे इमले उभे राहत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, भूमाफियांचे कंबरडे मोडण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सर्व प्रभागांमध्ये झाडाझडती घेण्यास सुरुवात केली असून यापुढे एक जरी बेकायदा बांधकाम उभे राहिले तरी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. या दणक्यानंतर आज लगेचच खंबाळपाडा येथील उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर उभ्या राहत असलेल्या इमारतीवर हातोडा टाकण्यात आला आहे.
■ बिल्डरवर गुन्हा दाखल
महापालिकेच्या ‘फ’ प्रभागाचे अधीक्षक जयवंत चौधरी यांनी विकासक चेतन माळीविरोधात एमआरटीपी कायद्यानुसार टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आज सकाळी सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी महापालिका कर्मचारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने अनधिकृत इमारतीच्या तोडकामास सुरुवात केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List