महायुती सरकारला शक्तिपीठ महामार्ग रद्द करायला लावणार, मुंबईतील 12 मार्चचा मोर्चा यशस्वी करण्याचा संघर्ष समितीचा निर्धार
रत्नागिरी-नागपूर या पर्यायी महामार्गावर वाहने दुर्मिळ असताना 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरविणारा शक्तिपीठ महामार्ग शासनाने ताबडतोब मागे घ्यावा; अन्यथा येत्या 12 मार्चच्या मोर्चाद्वारे 10 हजारांहून अधिक शेतकरी आझाद मैदानावर सरकारला तो मागे घेण्यास भाग पाडतील, असा इशारा ‘शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती’कडून देण्यात आला आहे.
शक्तिपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. मात्र, महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसह महायुतीचे मंत्री व आमदारांचाही याला विरोध असल्याचे निदर्शनास आणून देत, विरोधी पक्षांतील आमदारांची मोट बांधून आंदोलन करून शक्तिपीठ महामार्ग पूर्णतः रद्द करायला भाग पाडू, असा निर्धारही करण्यात आला.
शक्तिपीठ महामार्गाविरोधात येत्या 12 मार्चला आझाद मैदानावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी अजिंक्यतारा कार्यालयात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शनिवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील होते. प्रत्येक गावात मोर्चासाठी जनजागृती करण्यात येणार असून, सायंकाळी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेतकरी मुंबईकडे मोर्चासाठी रवाना होणार आहेत.
या बैठकीस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, माजी आमदार के. पी. पाटील, कोल्हापूर जिल्हा एरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, सम्राट मोरे, ‘गोकुळ’चे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, सत्यजित जाधव, संपत देसाई यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करतेय – आमदार सतेज पाटील
60 गावांच्या शेतकरी प्रतिनिधींसमोर बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा करणारे राज्य सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करीत आहे. सरकारची भूमिका शेतकऱ्याला फसवणारी आहे. ‘शक्तिपीठ’बाबत सत्ताधारी पक्षामध्ये दोन मतप्रवाह सुरू असून, शेतकऱ्यांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग करण्याची भूमिका नसेल, तर सत्तेतील दोन आमदार शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा का देत आहेत?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘शक्तिपीठ महामार्ग थोपविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केले. ‘प्रत्येक कुटुंबातील किमान दोन सदस्यांनी मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ शेतजमीन नष्ट करणारा – गिरीश फोंडे
संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, ‘प्रसारमाध्यमांमध्ये विविध बातम्या पेरून व मुख्यमंत्री परस्परविरोधी विधाने करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. हा मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असेल; पण यासाठी शेतकऱ्यांच्या भविष्यातील पिढीची स्वप्ने, शेतजमीन नष्ट होणार आहे. त्यामुळे कंत्राटदारांसाठी असलेला हा वादग्रस्त शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाहीत.’ तसेच ‘यावेळी केवळ शेतकरीच नव्हे, तर मुंबईत राहायला गेलेली शेतकऱ्यांची पोरं आणि नातेवाईकदेखील मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होतील,’ असे विजय देवणे आणि के. पी. पाटील यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List