मुंबईत GBS चा पहिला बळी, नायर रुग्णालयात एकाचा मृत्यू
सध्या महाराष्ट्रातगुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईतही या आजाराचे थैमान पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत जीबीएस या आजाराने शिरकाव केला होता. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यातच आता मुंबईतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबईत जीबीएस आजारामुळे पहिला बळी गेला आहे. वडाळ्यात राहणाऱ्या एका 53 वर्षीय रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
नायर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळ्यात राहणारा एक रहिवाशी हा बीएन देसाई रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करत होता. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.
यामुळे पुण्यानंतर मुंबईतही जीबीएसचे थैमान पाहायला मिळत आहे. नायर रुग्णालयात या व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. वडाळ्यातील 53 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूमुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अंधेरीत एकाला लागण
काही दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे GBS ची लागण झाली होती. ही व्यक्ती अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहते. या व्यक्तीवर महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळं अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली होते.
मुरजी पटेल यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली होती. तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी 50 विशेष बेड राखीव ठेवावे, अशी सूचना केली होते. तसेच या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जावेत, अशी सूचनाही देण्यात आली होती.
पालघरमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीला जीबीएसची लागण
दरम्यान, पालघरमध्ये दहावीच्या एका विद्यार्थिनीला जीबीएसची लागण झाली आहे. या मुलीवर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, असी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List