अखेर संजय राऊत यांना वस्ताद मिळाला? बड्या नेत्याची खोचक टीका; म्हणाले, तू असाच जळत…
मंगळवारी दिल्लीत पुरस्कार देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला. मात्र यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी यावरून एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांच्या या टीकेला आता शिवसेनेचे नेते, मंत्री दादा भुसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले दादा भुसे?
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अथक कष्ट करत शून्यातून बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मार्गक्रमण केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल म्हणून त्यांचा दिल्लीत गौरव करण्यात आला. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. या गोष्टीचा महाराष्ट्राला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे, परंतु काही लोकांच्या पोटात कायमचा गोळा आहे. एकनाथ शिंदे व आम्ही सर्व एकत्र असतांनाही त्यांच्या पोटात गोळा होता, रोज त्यांची मळमळ बाहेर येते. हे भाकरी खातात मातोश्रीची आणि चाकरी करतात शरद पवारांची. मात्र एकनाथ शिंदे यांचा त्यांनी गौरव केला तर यांच्या पोटात पुन्हा गोळा उठला. यांच्याबद्दल न बोललेले बरं, तू असाच जळत रहा. एवढेच मी बोलेल’ अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिली.
राऊत नेमकं काय म्हणाले?
मंगळवारी शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला होता, मात्र विश्वासघात झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. त्यावर आता दादा भुसे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. काही लोकांच्या पोटात कायमचा गोळा आहे. एकनाथ शिंदे व आम्ही सर्व एकत्र असतांनाही त्यांच्या पोटात गोळा होता, रोज त्यांची मळमळ बाहेर येते, असं भुसे यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List