सर्वप्रथम कोणत्या अभिनेत्याने साकारली होती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?
छत्रपती संभाजीराजे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट ‘छावा’ हा सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतोय. प्रत्येकाच्या ओठांवर फक्त छावाचच नाव आहे. छावा चित्रपट हा काळजाला भिडणारा आहे. चित्रपटातील कलाकारांचेही तेवढेच कौतुक होतं आहे. विशेषकरून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा विकी कौशल. विकीच्या अभिनयाचं कौतुक करताना प्रेक्षक थकत नाहीयेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिका आणि चित्रपट आले आहेत पण हा लक्ष्मण उतेकरांनी दिग्दर्शित केलेला ‘छावा’ मात्र प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणारा आहे.
सर्वात पहिल्यांदा शिवाजी महाराजांची भूमिका कोणी साकारले होती?
आता लवकरच अभिनेता रितेश देशमुख हा शिवरायांच्या जीवनावरील चित्रपटात महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, दाक्षिणात्य अभिनेता रिषभ शेट्टीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावरील चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरही अनेक चित्रपट आणि मालिका निघाल्या आहेत. पण तुम्हाला माहितीये का सर्वात पहिल्यांदा शिवाजी महाराजांची भूमिका कोणी साकारले होती?
शिवरायांची गाथा सांगणारा चित्रपट पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत
छत्रपती शिवरायांची गाथा सांगणारा चित्रपट हा पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत काढला गेला. 1952 साली छत्रपती शिवाजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. भालजी पेंढारकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक होते. यात शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेते चंद्रकांत मांढरे यांनी साकारली होती. आजही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की, डोळ्यासमोर शिवरायांच्या वेशातले चंद्रकांत मांढरे येतात. पन्हाळ्यावर ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटाचं शूटिंग झालं होतं.

चंद्रकांत मांढरे भारदस्त व्यक्तिमत्व
चंद्रकांत मांढरे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1913 रोजी झाला होता. ते मुळचे कोल्हापूरचे होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. सावकारी पाश या त्यांचा पहिला चित्रपट होता. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी सिनेमांतही काम केलं आहे. बनगडवाडी हा चंद्रकांत यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 17 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांचे निधन झाले. रुबाबदार व्यक्तिमत्व, तेजस्वी चेहरा, भाषेवरचं प्रभुत्व आणि संवादाची लकब यासाठी ते प्रसिद्ध होते.
रितेश पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत
दरम्यान आता रितेश देशमुख घेऊन येत असलेल्या शिवरायांच्या जीवनपटावरील या चित्रपटात काय थरारक पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच रितेशला पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. रितेश छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत शिवरायांची कोणती गोष्ट मांडणार हे पाहण खरंच रंजक असणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List