“तो शोच तसा आहे, तो खूप चांगला मुलगा..”; भारती सिंगकडून समय रैनाचं समर्थन
कॉमेडियन समय रैना सध्या त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शोमध्ये परीक्षक म्हणून पोहोचलेल्या युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने आईवडिलांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. यावरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी रणवीर, समय आणि शोमधील इतर जणांवर पोलिसांत तक्रारी आणि एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. अशातच कॉमेडियन भारती सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तती समय रैना आणि शोमधील त्याच्या भाषेचं समर्थन करताना दिसतेय.
समय रैनाच्या या शोमध्ये भारतीने पती हर्ष लिंबाचिया, गायक टोनी कक्कर यांच्यासोबत हजेरी लावली होती. एका पापाराझीने तिला समयच्या ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, “तो शोच तसा आहे पण हे गरजेचं नाही की तुम्ही शोमध्ये जाऊन तेच बोलावं जी शोची गरज आहे. तुमची मर्जी- बोला किंवा नका बोलू. समय कुठे बोलतो की अरे तोंड उघडा, बोला. समय खूप चांगला मुलगा आहे आणि प्रतिभावानसुद्धा आहे. जेन-झीमध्ये (आताची पिढी) तो खूप लोकप्रिय आहे. तुम्हीसुद्धा त्या शोमध्ये गेलात तर त्याचे चाहते व्हाल. तो इतका चांगला आहे.”
समयच्या भाषेबद्दल भारती पुढे म्हणाली, “तो जी भाषा वापरतो, ते आवडत नसेल तर असे लाखो लोक आहे आणि आपणच आहोत जे समय रैनाचा शो लावून बघत बसतो.” भारतीच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ आताचा नसून जुना आहे. मात्र त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीर अलाहबादियाने आईवडिलांवरून केलेल्या वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी मुंबई पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. या शोचा कर्ताधर्ता कॉमेडियन समय रैना आणि रणवीर या दोघांना पोलीस चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. रणवीरच्या वक्तव्यावरून विविध स्तरांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी त्याला अनफॉलो करण्याचा सपाटाच लावला आहे. शोमध्ये रणवीर अलाहबादियासह कंटेंट क्रिएटर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह आणि अपूर्वा मखिजाही उपस्थित होते. त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबईतील दोन वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी सोमवारी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List