ज्युनियर मायकल जॅक्सन..; प्रभू देवाच्या मुलाचा डान्स पाहून नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
जसा बाप अगदी तसाच बेटा.. हे डान्सर आणि कोरिओग्राफर प्रभू देवाच्या बाबतीत आम्ही नाही तर असंख्य नेटकरी बोलत आहेत. प्रभूदेवाने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या मुलाचा आहे. त्यात प्रभू देवाचा मुलगा ऋषी राघवेंद्र देवा स्टेजवर वडिलांसारखाच जबरदस्त डान्स करताना दिसतोय. यानिमित्ताने मुलाला पहिल्यांदाच प्रकाशझोतात आणल्याचं प्रभू देवाने म्हटलंय. त्याचप्रमाणे प्रभू देवाने इतक्या वर्षांपासून जे काम केलंय, जो नाव कमावलंय.. त्याचाच वारसा मुलगा पुढे नेण्यासाठी हळूहळू सज्ज होतोय, असं त्याने म्हटलंय. राघवेंद्रच्या डान्सच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
प्रभू देवाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये तो आणि त्याचा मुलगा स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहेत. नंतर प्रभू देवा स्टेजवरून बाजूला होतो आणि त्यानंतर त्याचा मुलगा परफॉर्म करू लागतो. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये प्रभू देवाने लिहिलं, ‘माझा मुलगा ऋषी राघवेंद्र देवाची ओळख करून देताना मला खूप अभिमान वाटतोय. आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकत्र परफॉर्म केलंय. हे केवळ डान्स नाही तर त्यापेक्षा अधिक.. एक वारसा, एक आवड आणि एक प्रवास आहे, ज्याची आता सुरुवात होतेय. ‘
राघवेंद्रच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अगदी बापासारखाच मुलगा’ असं एकाने म्हटलंय. तर ‘त्याच्या डान्समध्ये तुमचीच स्टाइल दिसून येते’, असं दुसऱ्याने लिहिलंय. प्रभू देवाला ‘इंडियन मायकल जॅक्सन’ असंही म्हटलं जातं. त्याला सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. त्याचप्रमाणे दिग्दर्शन क्षेत्रातही प्रभू देवाने नाव कमावलंय. सलमान खानच्या ‘वाँटेड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभू देवानेच केलंय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानंतर त्याने ‘रावडी राठोड’, ‘आर राजकुमार’, ‘सिंग इज ब्लिंग’ यांसारख्या चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं.
प्रभू देवाने लताशी लग्न केलं असून यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या तिसऱ्या मुलाचं 2008 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी कॅन्सरने निधन झालं होतं. तर 2011 मध्ये प्रभू देवाने लताला घटस्फोट दिला. अभिनेत्री नयनतारासोबतच्या रिलेशनशिपमुळे प्रभू देवाच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र 2012 मध्ये नयनतारानेही प्रभू देवाशी ब्रेकअप केल्याचं जाहीर केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List