‘छावा’ची स्क्रीप्ट ऐकताच विकी कौशल भावूक झाला, हात जोडून म्हणाला…; लेखकाचा मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा ‘छावा’ सिनेमा सध्या सगळीकडे धुमाकूळ घालताना दिसत आहे. विकीने या सिनेमामध्ये साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. चित्रपटगृहामधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या तोंडात विकीचे नाव आहे. दरम्यान, विकीला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा त्याची प्रतिक्रिया कशी होती याविषयी सिनेमाच्या लेखकाने खुलासा केला आहे.
‘छावा’ सिनेमाचे लेखन हे मराठमोळा तरूण ओंकार महाजनने केले आहे. ओंकार हा सिनेमाच्या लेखनाच्या टीमचा एक भाग होता. नुकतीच त्याने ‘लेट्स अप’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ‘छावा’ सिनेमाची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर विकी कौशलची प्रतिक्रिया कशी होती यावर भाष्य केले आहे. ‘छावा सिनेमामुळे आम्ही विकी कौशलसोबत पहिल्यांदाच काम केले. आम्ही या सिनेमाचे लेखक आहोत. जेव्हा चित्रपटाची स्क्रीप्ट तयार झाली आणि विकी कौशलचे फायनल कास्टिंग झाले तेव्हा आमच्या काही मिटिंग झाल्या. विकीसोबत झालेली पहिली मिटिंग मला चांगली आठवते. आम्ही तीनही लेखक या मिटिंगला उपस्थित होतो. तसेच लक्ष्मण उतेकर सर स्वत: तेथे हजर होते’ असे ओंकार म्हणाला.
पुढे तो म्हणाला, ‘लक्ष्मण उतेकर सरांनी विकीला चित्रपटाची स्क्रीप्ट वाचून दाखवली. मध्यांतरानंतर आमचा एक कॉफी ब्रेक झाला. त्यानंतर सरांनी पुढची स्क्रीप्ट वाचून दाखवली. मला आजही चांगले आठवत आहे की स्क्रीप्ट ऐकल्यानंतर विकीचे डोळे पाण्याने भरले होते. त्याला अश्रू अनावर झाले होते असे मी म्हणणार नाही. पण त्याच्या डोळ्यात पाणी होते. त्याने सगळ्यांसमोर हात जोडले होते. त्यानंतर विकी म्हणाला की तुम्ही माझ्याकडे बोलण्यासाठी काही ठेवलच नाही.’
छावा सिनेमाविषयी
छावाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने साकारली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसत आहे. तर अक्षय खन्ना यांच्यासह आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग यांनी देखील सिनेमात उत्कृष्ट काम केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List