‘छावा’ पाहिल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मनाला भिडणारी पोस्ट; ‘हाथी घोडे, तोफ तलवारे..’
सध्या सोशल मीडियावर आणि थिएटरमध्ये लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. आता आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनीसुद्धा ‘छावा’ पाहिल्यानंतर पोस्ट लिहिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांकडून आपण काय शिकावं, याबद्दलही त्यांनी लिहिलंय.
विश्वास नांगरे पाटील यांची पोस्ट-
‘छावा.. जिंदा रहे. काळजाला चिरत जातात या काव्यपंक्ती, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात, त्यांची जीभ खेचून काढली जाते. सळसळतात धमन्या, ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते. ‘मन के जीते जीत, मन के हारे हार , हार गये जो बिनलढे,उनपर हैं धिक्कार’.. केवढी उमेद केवढी प्रेरणा देणारे हे शब्द. स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंझायची ऊर्जा देतात.
‘हाथी घोडे, तोफ तलवारे, फौज तो ‘तेरी सारी हैं पर जंजिरोंमे जकडा हुआ मेरा राजा अब भी सब पे भारी हैं! छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे. मराठी माणसाच्या स्वभिमानाचे, स्फुल्लिंगाच प्रतीक आहे, स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत, मूर्तिमंत द्योतक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रौढ, प्रताप, पुरंदर स्वरूप आहे. असा पराक्रमी, शूर आणि चतुरस्त्र भूप होणे नाही. प्रभु शंभूराजे, शतशः नमन तुम्हाला. काय घ्यावं आम्ही मावळ्यांनी तुमच्या धगधगत्या आयुष्यातून?’
‘आम्ही घ्यावा निर्भयपणा, आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी, विचारांची आणि कृतींची. आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुस्मटलेलं जगणं, घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द, करारी बाणा आणि महाराष्ट्र धर्म! समतेचा, नीतिमत्तेचा शिकावा धडा. राहावा मनोमनी चिंतावा क्षणोक्षणी, शेर शिवराज आणि त्यांचा छावा! जगदंब जगदंब!,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आतापर्यंत या चित्रपटाने 417.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं विशेष कौतुक होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List