प्राजक्ता माळीला मोठा झटका; महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध
महाशिवरात्रीला नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी यासंदर्भात ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवलं आहे. यापूर्वी सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाची मंदिरात परंपरा नाही, असं त्यांनी पत्रात म्हटलंय. म्हणूनच प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध केला जात आहे. महाशिवरात्रीला सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाने चुकीचा पायंडा पाडू नये, असं मत ललिता शिंदे यांनी मांडलं आहे. मंदिर विश्वस्तांच्या वतीने प्राजक्ताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात प्राजक्ताचा ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र या कार्यक्रमामुळे मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये, असं ललिता यांनी म्हटलंय.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होते. यादिवशी मंदिर विश्वस्तांकडून कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. यंदा शिवस्तुती नृत्याविष्काराचा कार्यक्रम मंदिर विश्वस्तांकडून आयोजित करण्यात आला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाते. याआधी तिने श्री श्री रवीशंकर यांच्या बेंगळुरू इथल्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन’च्या आश्रमातही लावणी सादर केली होती. शास्त्रीय- उपशास्त्रीय नृत्य संगीताच्या मेळाव्यात प्राजक्ताला गुरुंसमोर लावणी सादर करण्याची संधी मिळाली होती.
आपल्या दमदार नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला महाशिवरात्रीनिमित्त नृत्याद्वारे शिवस्तुती सादर करण्याची संधी त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्तांकडून देण्यात आली. मात्र त्याला आता विरोध करण्यात येत आहे. यावर अद्याप मंदिर विश्वस्तांकडून किंवा प्राजक्ताकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. या पत्रानंतर कार्यक्रमाबाबत कोणता निर्णय घेतला जाईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस 24 तास सुरू राहणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारीला सकाळी चार वाजल्यापासून ते 27 तारखेच्या रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर राहणार 24 तास सुरू असणार आहे. तसंच या काळात व्हिआयपी आणि इतर भाविकांसाठी गर्भगृह दर्शनदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शन देखील बंद राहणार आहे. बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर मंदिर 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List