वाईतील दोघांनीच दिली मुंबईतील चोरट्यांना टीप,सराफ बाजारातील चोरीचे गुढ उकलले; चौघांना अटक
वाई सराफ बाजारातील सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांना पिस्टल व कोयत्याचा धाक दाखवून झालेल्या चोरीचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यामध्ये वाईतीलच दोघांनी मुंबईतील चोरट्यांना टीप देऊन ही चोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चोरट्यांकडून 4 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अनुज गंगाराम चौगुले, रॉय ऊर्फ रॉयल एडव्हर्ड सिक्वेरा (दोघेही रा. नालासोपारा), सुधीर गणपत शिंदे (वय 56, रा. गंगापुरी, वाई) व सीताराम चोरट (रा. वाई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
संशयित अनुज व रॉय यांना वसईतील माणिकपूर पोलिसांनी विरार येथील एका चोरीप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी वाईतही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांचा ताबा वाई पोलिसांकडे देण्यात आला. वाई पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केली असता, संशयितांनी सांगितले की, धर्मपुरी पेठेत कापडाचे दुकान असणारे व्यापारी सुधीर गणपत शिंदे (वय 56, रा. गंगापुरी, वाई) हा सीताराम चोरट, अनुज व रॉय हे तिघे एकत्र आले. यानंतर सुधीर याने सर्वांना वाईतील ज्वेलरी परिसर दाखवला. त्यामध्ये त्यांनी आवर्जुन संजय माइती व मृत्यूंजय माइती यांचे सोन्या-चांदीचे दागिने बनवण्याचे कारखाने दाखवले. तसेच ही दुकाने रात्री ९ वाजता बंद होत असल्याचे सांगून काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे सांगितले. सीताराम चोरट याने वाईत येणाऱ्या रस्त्यांची माहिती देऊन कोणत्या रस्त्याचा वापर करायचा, याची माहिती पुरवली.
त्यानुसार 28 जुलै 2024 रोजी अनुज व रॉयल यांनी अगोदरच चोरी केलेली दुचाकी घेऊन वाईत दाखल झाले. यानंतर सीताराम चोरट याच्या फोनची वाट पाहू लागले. यानंतर चोरटसह तिघांनी माइत यांच्या दुकानात जाऊन जबरी चोरी केली. तसेच चोरी केलेले साहित्य कोईम्बतूर व वसईत विकल्याचे संशयितांनी सांगितले. यावरून 4 लाख 15 हजार 152 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगावकर, निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक निरीक्षक अमोल गवळी, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, अजित जाधव, प्रसाद दुदुस्कर, राम कोळी, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड, विशाल शिंदे, गोरख दाभाडे, धीरज नेवसे, स्नेहल सोनावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List