मुंबईत मराठीचा अवमान थांबेना, बड्या शोरुमच्या मॅनेजरकडून गुजराती-हिंदी बोलण्याची सक्ती, व्हिडिओ व्हायरल
Mumbai News: महाराष्ट्राच्या मुंबईत मराठी भाषेच्या अवमान घडण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांमध्ये वाढत आहे. मराठी भाषा आणि मराठी व्यक्तींचा द्वेष करण्याचे प्रकार मराठी माणसांच्या मुंबईत घडत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये असा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर डोंबिवलीत असा प्रकार समोर आला. आता मुंबईतील क्रोफर्ड मार्केट भागात मराठी भाषेला विरोध करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर संबंधित तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शोरुम गाठत मॅनेजरला धडा शिकवला. त्याला मराठीतून माफी मागायला लावली. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
काय घडला प्रकार
मुंबईतील क्रोफर्ड मार्केट भागात रुपम शोरूम आहे. या शोरुममध्ये असलेल्या मॅनेजरने एका मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्याची जबरदस्ती केली. तसेच मी देखील मराठीत बोलणार नाही, असे तो मॅनेजर त्याला सांगू लागला. त्यानंतर या तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे तक्रार केली. संतोष शिंदे यांनी शोरुम गाठत त्या मॅनेजरला जाब विचारला. त्याला मराठी बोलायला लावले. मराठीतून माफी मागायला लावली. हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कल्याण-डोंबिवलीत घडला होता प्रकार
कल्याण पश्चिमेमध्ये मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मराठी-अमराठी वाद झाला होता. कल्याणमधील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत अखिलेश शुक्ला यांनी मराठी माणसांचा अपमान करणारे शब्द वापरले होते. त्यानंतर धीरज देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. तसेच एका अमराठी महिलेने ‘तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खावून घाण करणारे आहात,’ अशी शेरेबाजी केली होती. त्या प्रकरणानंतर डोंबिवलीत एका 82 वर्षांच्या मराठी व्यक्तीला हिंदीत बोलण्यास भाग पाडण्यात आले होते. मुंबईतील महापेक्स प्रदर्शनात हा प्रकार घडला होता.
मुंबईत रुपम शोरूमच्या मॅनेजरने मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्याची सक्ती केली#MNS #Shivsena #Marathi #Mumbai pic.twitter.com/eeyCxyVAL0
— jitendra (@jitendrazavar) February 16, 2025
मागील काही महिन्यांत मुंबई आणि परिसरात मराठी-अमराठी वाद होण्याच्या घटना वाढल्या आहेत. कल्याणमध्ये मराठी तरुणाला परप्रांतीय रिक्षा चालकांनी मारहाण केली होती. डोंबिवलीमध्येही पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला सोसायटीतील अमराठी लोकांनी विरोध केला होता. महाराष्ट्राच्या मुंबईत, मराठी माणसांच्या मुंबईत मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा अवमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाही. तसेच मराठी पाट्या आणि मराठी भाषा बोलण्याची सक्ती करण्याची गरज आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List