Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी फक्त याच महिला पात्र, अजितदादांकडून सर्वात मोठी अपडेट
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एकूण सात हाफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, आता लवकरच फेब्रुवारीचा हाफ्ता देखील महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो.
ही योजना सुरू करतानाच योजनेसाठी काही अटी देखील होत्या. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावं. लाभार्थी महिलेचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावं. तसेच इतर देखील काही अटी होत्या. मात्र काही महिलांकडून या निकषात बसत नसताना देखील योजनेचा लाभ घेण्यात आला. ही गोष्ट लक्षात येताच आता ज्या महिला या योजनेत बसत नाहीत अशा सुमारे पाच लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. आता या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
शेतकाम करणारी महिला, धुणीभांडी करणारी महिला, स्वयंपाक करणारी महिला, गरीब महिला, भाजी विकणारी महिला यांच्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. ज्या महिलांचं महिन्याचं उत्पन्न हे वीस हजार रुपये आहे, अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत. ज्या महिलांना इतर कुठलाच लाभ मिळत नाही, अशा महिलांसाठी ही योजना आहे. आधी अशी चर्चा सुरू होती, की ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच अपत्य असावीत. मात्र नंतर असं लक्षात आलं, ज्या महिलांचा पगार हा चाळीस हजार रुपये आहे, घरी चारचाकी गाडी आहे, अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र आता जो लाभ दिला आहे, तो परत घेणार नाही. लाभ दिला आहे तो परत घेणार नाही, भाऊबीज, राखी पौर्णिमा भेट परत घेण्याची संस्कृती आपली नाही. काही महिलांनी नावं मागे घेतली आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List