खेलोगे, कूदोगे तो बनोगे नवाब; आता क्रिकेटमध्ये करिअर घडवा, MCA चा पदवीधर अभ्यासक्रम तयार
क्रिकेटचे देशातील तरुणाईवरच नाही तर अबालवृद्धांवर मोठे गारूड आहे. गावखेड्यातील क्रिकेटचे सामने, त्यातील थरार काही औरच असतो. इतकेच काय आपल्याकडे गल्ली क्रिकेट पण तितक्याच जोषात खेळल्या जातो. क्रिकेट हाच काहीचा धर्म तर काहींची जात आहे. अनेकांच्या रक्तात क्रिकेट दिसून येते. विश्वचषक, आयपीएल म्हणजे अनेकांसाठी सण, उत्सवच असतो. तहान-भूक हरपून अनेकजण मैदानावर घाम गाळतात. अशा सर्व क्रिकेट प्रेमींसाठी एक खास बातमी आली आहे. आतापर्यंत करिअरसाठी योग्य दिशा, योग्य मार्ग सापडत नव्हता. या क्षेत्रात करिअरच्या संधी शोधण्यासाठी हक्काचा अभ्यासक्रम नव्हता. ही कमी मुंबई क्रिकेट असोसिएशनने भरून काढली आहे. एमसीएने एक मोठं पाऊल टाकलं आहे. MCA क्रिकेट पदवीचा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. त्याचा फायदा अनेक उमद्या खेळाडूंना होणार आहे.
MCA च्या बैठकीत मोठा निर्णय
क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने पदवी अभ्यासक्रम (Mumbai Cricket Association Graduate Course) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच एमसीएच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचे समोर आले आहे. क्रिकेटमध्ये मोठे करिअर घडवण्याचे स्वप्न यामुळे प्रत्यक्षात येणार आहे.
मुंबई विद्यापीठ आले धावून
मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अनेक कोर्स सुरू आहेत. आता त्याला व्यापक स्वरूप देण्यात येत आहे. क्रिकेटमध्ये अनेक जणांना करिअर करण्याचे स्वप्न आहे. प्रत्येकाला फलंदाज, गोलंदाजच व्हायचे असे नाही, त्यातील इतर करिअरच्या वाटा सुद्धा तरुणाईला खुणावत आहेत. तरुणच नाही तर मोठ्या प्रमाणात तरुणी सुद्धा क्रिकेटकडे वळल्या आहेत, हे विशेष.
MCA ने या सर्व क्रिकेट प्रेमींसाठी पदवीधर अभ्यासक्रम आखला आहे. इयत्ता 12 वी आणि पदवीनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. पदवी आणि पुढील अभ्यासक्रम कसा असेल, यावर खल सुरू आहे. लवकरच त्याची रुपरेषा समोर येईल. सध्या एमसीएकडे 40 हजार क्रिकेटपटूंनी नोंदणी केलेली आहे. तर त्यातील 10 हजार खेळाडू हे सक्रिय आहेत. त्या सर्वांना या अभ्यासक्रमाचा मोठा फायदा होणार आहे. मुंबई बाहेरील खेळाडूंसाठी ऑनलाईन अभ्यासक्रमाची सोय करण्याची तयारी करण्यात येत आहे. व्यावहारिक अभ्यासक्रमाला, सरावाला अधिक महत्त्व देण्यात येणार आहे.
या अभ्यासक्रमात क्रिकेटमधील खाचखळगे शिकवण्यात येतील. फलंदाजी, गोलदांजी शिवाय, सामन्यांचे समालोचन करण्याविषयी शिकवण्यात येईल. पंचगिरीचा अभ्यासक्रमात भाग असेल. क्रिकेटमधील स्कोअरिंग, विविध नियम, त्यातील बदल याची माहिती देण्यात येईल. मैदानाची निगा, खेळपट्टी तयार करणे हे पण शिकवण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List