Kolhapur crime news – पैशांसाठी आजीचा खून; नातवासह दोन मित्रांना अटक
एक लाख रुपये उसने दिले नसल्याच्या कारणावरून नातवानेच दोन मित्रांच्या साहाय्याने सगुणा तुकाराम जाधव या 80 वर्षांच्या आजीचा खून केल्याची खळबळजनक घटना कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नातवासह तिघांना अटक केली.
खुनाची घटना समोर येताच, अवघ्या तासाभरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नातू गणेश राजाराम चौगले (वय – 28, रा. विक्रमनगर, इचलकरंजी) याच्यासह त्याचा मित्र नरेश उर्फ नरेंद्र दगडू करपे (वय – 25, रा. म्हसोबा गल्ली, विक्रमनगर, इचलकरंजी) आणि एका अल्पवयीन मुलाला इचलकरंजी शहरातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सोन्याच्या पाटल्या, कर्णफुले व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या तिघांना तपासासाठी मुरगूड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
काल दुपारी तीन ते रात्री साडेनऊच्या कालावधीत सेनापती कापशी (ता. कागल) येथील भोई वस्तीत राहणाऱ्या श्रीमती सगुणा तुकाराम जाधव या वृद्धेचा खून झाल्याची घटना समोर आली. नातू गणेश चौगले याने मित्रांच्या मदतीने उसने पैसे देत नसल्याच्या कारणावरून गळा आवळून व डोके आपटून आजीला ठार मारले. तसेच तिच्या हातातील सोन्याच्या दोन पाटल्या व कानातील कर्णफुले काढून नेल्याबाबत नातू सुशांत पुंडलिक जाधव (वय – 31, रा. सेनापती कापशी, ता. कागल) याने दिलेल्या फिर्यादीवरून मुरगूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना स्वतंत्र तपास पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक कळमकर यांनी आपल्या दोन स्वतंत्र तपास पथकांकडून हालचाली करत आरोपींना इचलकरंजी येथून ताब्यात घेतले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List