‘तुम करे तो रासलिला अन् हम…’ आव्हाडांनी राऊतांना सुनावलं, पवारांवरील टीकेला चोख प्रत्युत्तर
मंगळवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, मात्र यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आम्ही शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला, मात्र आता आमच्या विश्वासाचा घात झाला असं वाटतं असं संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत यांच्यासोबतच विनायक राऊत आणि सुषमा अंधारे यांनी देखील शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हटलं जितेंद्र आव्हाड यांनी?
‘तुम करे तो रासलिला… हम करे तो कॅरेक्टर ढिला ? तुम करे तो चमत्कार… हम करे तो बलात्कार ? दुहेरी मापदंड कशातच योग्य नाही.’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज शरद पवार यांच्यावर टिका केली होती. काल नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांनी सत्कार केला होता आणि त्यांचे कौतुकही केले होते. त्यानंतर ठाकरे गटाकडून तिव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टिका केल्यानंतर त्याला आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
तुम करे तो रासलिला… हम करे तो कॅरेक्टर ढिला ?
तुम करे तो चमत्कार… हम करे तो बलात्कार ?
दुहेरी मापदंड कशातच योग्य नाही.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 12, 2025
विनायक राऊत यांचीही टीका
दरम्यान दुसरीकडे याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी देखील शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे, ‘शरद पवार साहेबांनी गद्दार आणि बेईमान व्यक्तीचा सन्मान केला आहे, म्हणून राऊत साहेब जे बोलले ते बरोबर बोलले. शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवला होता, पण विश्वासघात झाला, असं राऊत साहेबांनी म्हटलं आहे’ असं विनायक राऊत यांनी म्हटलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List