शेठजींना मुलगा झाला… पोलीस आहे : बतावण्यांचे लोण , चोरट्यांचा धुडगूस; ज्येष्ठ महिलांना लक्ष
पुणे शहरातील विविध भागांत चोरट्यांनी प्रामुख्याने रस्त्याने एकट्या चाललेल्या महिलेला बतावणी करीत लूट केली जात आहे. ‘आमच्या शेठला मुलगा झाला आहे, यासह आम्ही पोलीस आहोत, दागिने आमच्याकडे द्या,’ अशी बतावणी करीत चोरटे सुसाट आहेत.
रस्त्याने पतीसोबत पायी चाललेल्या महिलेला गाठून तिघा चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांच्याकडील 2 लाख 75 हजार रुपयांचे दागिने घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली आहे. ही घटना 8 फेब्रुवारीला सकाळी दहाच्या सुमारास विश्रांतवाडीतील एअरपोर्ट रस्ता परिसरातील सृष्टी पानशॉपसमोर घडली आहे.
71 वर्षीय महिला पतीसोबत रस्त्याने पायी जात होती. आजूबाजूला कोणीही नसल्याची संधी साधून तिघाजणांनी त्यांना गाठले. आम्ही पोलीस आहेत, अशी बतावणी केली. या परिसरात चोरटे असून, दागिने काढून पिशवीत ठेवा, असे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला पिशवी देऊन पावणेतीन लाखांचे दागिने काढून ठेवले. काही वेळात चोरट्यांनी महिलेसह पतीला बोलण्यात गुंतवले. त्यानंतर हातचलाखीने पिशवी लांबवून दुसरीच पिशवी महिलेच्या हातात दिली. दागिने चोरल्यानंतर टोळक्याने धूम ठोकली.
साडीवाटप, मोफत रेशन अशा थापा
शहरातील विविध भागांत एकट्या पादचारी ज्येष्ठ महिलांना अडवून चोरट्यांनी लुटीचा सपाटा लावला आहे. ‘आमच्या शेठजींना मुलगा झाला असून, मोफत साडीवाटप सुरू आहे. तुमच्या गळ्यातील दागिने काढून ठेवा. तर तुम्हाला साडी मिळेल. तसेच गरिबांना दान देण्यासाठी आमचे शेठ मोफत रेशनधान्य वाटप करीत आहेत. आम्ही पोलीस असून, तुमचे दागिने पिशवीत काढून ठेवा,’ अशाप्रकारची बतावणी करीत चोरटे लूट करीत आहेत. मात्र, याकडे ना स्थानिक पोलिसांचे ना गुन्हे शाखेच्या पथकाचे काहीही लक्ष नसल्याचे दिसून आले आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ महिलांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांकडून टोळीला अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List