16 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी घटस्फोट; ‘कोमोलिका’च्या मुलांना माहीत नाही त्यांचे वडील कोण?
‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारून अभिनेत्री उर्वशी ढोलकिया घराघरात पोहोचली. ही मालिका बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झाली असली तरी आजही उर्वशीला प्रेक्षक कोमोलिका म्हणून चांगलंच ओळखतात. उर्वशीने इतरही मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ती एक आहे. मात्र उर्वशीला तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. उर्वशीने वयाच्या सोळाव्या वर्षीच लग्न केलं होतं. तर 17 व्या वर्षी ती जुळ्या मुलांची आई बनली आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी लगेचच म्हणजेच वयाच्या अठराव्या वर्षी उर्वशीचा घटस्फोट झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशी तिच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
‘हॉटलफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत उर्वशी म्हणाली, “सोळाव्या वर्षी लग्न, त्यानंतर बाळंतपण आणि लगेच अठराव्या वर्षी घटस्फोट.. या सर्वांचा माझ्या मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम झाला होता. एक वेळ अशी होती जेव्हा मी स्वत:ला एक महिन्यासाठी एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. माझ्यासोबत नेमकं काय घडलंय, हे मला समजून घ्यायचं होतं. मी स्वत:ला पूर्णपणे गप्प केलं होतं. मी कोणाशीच बोलत नव्हती. घडलेल्या सर्व गोष्टींनंतर मी आयुष्यात पुढे कशी जाऊ, हे समजण्याचा मी प्रयत्न करत होते. मी भावनिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते.”
“माझी मुलं जेव्हा दीड वर्षांचे होते, तेव्हापासून त्यांचा त्यांच्या वडिलांशी कोणताच संपर्क नाही. त्यावेळी मी 18 वर्षांची होती. मला कमी वयातच आई आणि वडील दोघांची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली. आता माझ्या मुलांना हे जाणूनच घ्यायचं नाहीये की त्यांचे वडील कोण आहेत? आम्ही याबद्दल एकत्र चर्चा केली होती. मात्र ते मला म्हणाले की, त्यांना त्यांच्या पित्याविषयी जाणून घ्यायचं नाही. हा पूर्णपणे त्यांचा निर्णय होता. मी त्यांना त्यांच्या वडिलांबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते न जाणून घेण्याबाबत स्पष्ट होते. नंतर मीसुद्धा तो विषय सोडून दिला”, असं उर्वशीने सांगितलं.
आयुष्याच्या कठीण काळात आईवडिलांनी खूप साथ दिल्याचं उर्वशीने सांगितलं. “घटस्फोट नेहमीच त्रासदायक असतो. पण त्यामुळे मी स्वत:ला खचू देणार नाही. त्यावेळी मी खूप तरुण होती. माझ्या पालकांच्या पाठिंब्याशिवाय मी सर्व कसं सांभाळलं असतं, मलाच माहीत नाही. आज मी ज्याठिकाणी आहे, त्याचं पूर्ण श्रेय माझ्या पालकांना जातं”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List