साहित्य जगत- विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने

साहित्य जगत- विश्व मराठी  संमेलनाच्या निमित्ताने

>> रविप्रकाश कुलकर्णी

सरकार, सरकारी कारभार असं काही म्हटलं की, अनुभवाने मन काही प्रसन्न होत नाही. त्याला एक प्रकारचा खाकी वास येऊन उद्विग्नता येते. मन काही प्रसन्न होत नाही. किंबहुना त्यामुळेच सरकारी काम म्हणजे मनस्ताप आणि नकोसं असं वाटायला लागतं.

अर्थात हा अनुभवांती निष्कर्ष असतो यात शंकाच नाही, पण यालादेखील कमी-जास्त अपवाद असू शकतो. नव्हे, आहेतच. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे विश्व मराठी संमेलन 2025. त्यात पुन्हा सरकारी कारभार म्हटला की, घाईगडबड, कुणाचा कुणाला ताळमेळ नाही, वेळेचं नियोजन आणि भान तर जवळजवळ सुटलेलं. हाच स्थायिभाव की काय? अशी परिस्थिती कायम झालेली आहे, पण त्यामुळेच हे असंच चालायचं असं गृहीत धरून अशा कार्यक्रमाला जायचं अशी मनोभूमिकादेखील झालेली आहे. त्यामुळेच आणखी एक कार्यक्रम झाला असं म्हणून नव्याला सामोरं जायचं हे आता ठरून गेलं आहे.

मात्र त्याच वेळी हेदेखील खरं की, त्यांच्या उपक्रमाला सकारात्मक साथ द्यायला हवी. कारण त्यामुळेच चांगलं होण्याची शक्यता निर्माण होते. काही न करण्यापेक्षा थोडं तरी काम करणं बरं नव्हे का? याचं कारण सरकारी कार्यक्रम म्हटला की, कार्यारंभीच त्याच्या शक्यता अशक्यतेची चर्चा सुरू होते. हा आमचा स्थायिभाव म्हणावा काय?

मराठी विश्व संमेलनाच्या तारखा 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारी या नक्की झाल्या, परंतु त्या संबंधातील कार्यक्रम पत्रिका अगोदर का झाली नसावी? याचं कारण अर्थातच कुठल्या कार्यक्रमात कोण सहभागी आहे याची निश्चिती झाली नसणार. ‘नियोजनाचा अभाव’ हे त्याचं उत्तर आहे. अर्थात हे तरी नवीन आहे का? यापूर्वी झालेली संमेलनेच कशाला, कुठलंही सरकार म्हटलं की, त्यांचा कार्यक्रम म्हणजे ‘सब घोडे बारा टके’ हा अनुभव आपल्याला नवीन थोडाच आहे? मग विश्व मराठी संमेलन तरी त्याला अपवाद कसा असेल?

वरळी येथे झालेले पहिले विश्व मराठी संमेलन, दुसरे विश्व मराठी संमेलन नव्या मुंबईत झालं. त्या अनुभवातून कोण काय शिकलं? सरकार म्हणणार, आम्हाला काय पाहिजे ते आम्ही करणार. राहता राहिले तुम्ही आम्ही श्रोते. दोन-चार दिवस आपण ठणाणा करणार. हे सगळं म्हणजे अरण्यरुदन आहे. हे माहीत असूनसुद्धा यातून आपण काय शिकतो, तर जे जे होईल ते पहावे आणि होता होईतो सोसावे. इतकी वर्षे हेच आपण करत आहोत ना? यापूर्वीची दोन विश्व मराठी संमेलनं झाली. त्याची फलश्रुती काय? असा प्रश्न किती जणांना पडला असेल? शासनावर असल्या गोष्टींचा ढिम्म परिणाम होत नाही हे आपण पाहतोच. जणू काय त्यांना म्हणायचं असतं, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा, आम्हाला पाहिजे तेच आम्ही करणार. पुनः पुन्हा करत राहणार!

पुण्यात झालेलं तिसरं विश्व मराठी संमेलन अनुभवताना मागील संमेलनातील गडद परिणाम विसरणं कसं शक्य आहे? याचाच अर्थ काहीतरी चुकते आहे हे नक्की. याचा दुसरा अर्थ ‘योजकः तत्र दुर्लभः’ हेच खरं. तसंच आमच्या आयुष्यातील अशा सगळ्याच घटना म्हणजे इव्हेंट झालेले आहेत. मग तो प्रसंग तिलांजलीचा असो नाहीतर अक्षता टाकण्याचा. मात्र तीळ आणि तांदळाचा संदर्भ समजून सांगावा लागेल, अशी आजची मराठीची दशा आहे. याची काळजी कोणी आणि कशी करायची? हा तर मोठा प्रश्न आहे. ‘मराठा तितुका मेळवावा’ या अतिव्याप्त विचारापासून आपण ‘मराठी तितुका मेळवावा’ म्हणताना आमचं जग आम्ही संकुचित करतोय असं तर होत नाही ना?

तिसरं विश्व मराठी संमेलन पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या भव्य प्रागंणात भरलं होतं. त्यामुळे आपोआपच आपण शैक्षणिक परिसरात आलो आहोत, यामागे एक मोठी परंपरा आहे असं भान आपोआपच येत होतं. तसंच विश्व संमेलनाच्या निमित्ताने मोठा आकर्षक मंडप, आणि आजूबाजूला केलेली कलात्मक सजावट यांचा एकूण परिणाम निश्चितच होत होता. ग्रंथ प्रकाशकांना वा ग्रंथ विक्रेत्यांना जी दालनं दिली होती, त्यात खोट काढायला जागाच नव्हती. शिवाय त्यासाठी त्यांना कुठलाही खर्च करायला लागला नाही. खरं तर मराठी पुस्तकं मराठी वाचकांना पाहायला मिळावीत म्हणून ही एक प्रकारची जाहिरात, तीदेखील कुठलेही शुल्क न करता केलेली सोय होती. संमेलनाला आलेल्या बहुतेकांना ही पर्वणीच वाटली. या गोष्टीकडे परदेशी म्हणजे या संमेलनासाठी जी परदेशस्थ मंडळी आली, त्यांना त्याचा किती उपयोग झाला हे कळले पाहिजे. या संमेलनात सहभागी झालेले एक परदेशस्थ मोहन रानडे मला म्हणाले, “आम्ही केवळ ‘बघे’ म्हणून वा श्रोते म्हणून आलो का? आमच्यातदेखील उत्तम लेखक, कलाकार वगैरे आहेत. ते गुण इथल्या लोकांना कसे दिसणार? आमचादेखील काही सहभाग असणारे कार्यक्रम इथे हवे होते.’’ मोहन रानडे यांची ही तक्रार प्रातिनिधिक समजायला हरकत नाही.

थोडक्यात, विश्व संमेलन रुजायला हरकत नाही याचा अर्थ आपल्याकडील सांस्कृतिक समस्यांकडे दुर्लक्ष करायला हवं असं काही नाही. दुर्लक्ष होत असेल तर त्याकडे पुनः पुन्हा लक्ष वेधलंच पाहिजे. त्याचबरोबर हेदेखील तितकंच खरं की, ही विषम लढाई आहे. त्यामुळे “राजा, तू चुकतो आहेस’’ हे जसं सांगायला पाहिजे तसंच तुम्ही आम्हीदेखील जागल्याची भूमिका पार पाडली पाहिजे. म्हणजे ‘येरे माझ्या मागल्या’ अशी वेळ येणार नाही!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! ‘जोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी..’, सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय मोठी बातमी! ‘जोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी..’, सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनंतर आता राज्यात वातावरण चांगलंच तापलं...
साहित्य संमेलनातील मर्सिडीज पुराण, राज्यात आले तुफान, ठाकरेंविरोधात जुन्या सहकाऱ्याने पाजळली तलवार
सततच्या ट्रोलिंगबद्दल हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडने सोडलं मौन; म्हणाली “आयुष्यात निराश..”
माप ओलांडताना ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिताचा खास उखाणा; सासरी नवरीचं दणक्यात स्वागत
मराठी अभिनेत्रीने काशीला जाऊन केलं केशदान; व्हिडीओ शेअर करत म्हणाली,”मनातून आवाज आला अन्…”
कपूर कुटुंबातील सर्वात श्रीमंत सून, तिच्याकडे अब्जांची संपत्ती, करीना – रणबीर तिच्यासमोर फेल
डार्क चॉकलेट ह्रदयरोग, मधुमेह, त्वचेसाठी फायदेशीर? जाणून घ्या