हिंदू व्यक्ती बनणार FBI संचालक? पहिल्यांदाच हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तिचं नामांकन, ट्रम्प यांचं मोठ पाऊल
अमेरिकेत वर्णद्वेषाचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. त्यावर उपाय म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( President Donald Trump ) यांनी आता महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ( FBI ) च्या संचालक पदासाठी हिंदुस्थानी वंशाचे काश पटेल यांचं नामांकन करण्यात आलं आहे. हिंदुस्थानी मूल्यांचे जतन करणाऱ्या काश पटेल यांचं अमेरिकेत खूप कौतुक केलं जात आहे. FBI संचालकपदाच्या सिनेट न्यायिक समितीच्या सुनावणीदरम्यान काश पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना आपल्याला दुर्दैवाने अमेरिकेत वैयक्तिकरित्या वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. मात्र याबद्दल अधिक काही बोलायचे नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जर काश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर FBI चे पहिले हिंदू आणि हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन संचालक बनतील.
सिनेट न्यायपालिका समितीच्या सुनावणीदरम्यान सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना काश पटेल हे बोलत होते. त्यांना कधी वंशवादाचा सामना करावा लागला आहे का असं विचारण्यात आलं होतं. पटेल पुढे म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मला एफबीआयच्या संचालकपदी नियुक्त करण्यामागील हेतू सांगितला त्यावेळी त्यांचा उद्देश कळला आणि आदरही वाटला. आज इथे मी केवळ माझ्या पालकांची स्वप्नंच पूर्ण करतो आहे असं नाही तर न्याय, निष्पक्षता आणि कायद्याच्या राज्यासाठी उभे राहणाऱ्या लाखो अमेरिकन लोकांच्या आशाही माझ्यासोबत आहेत. पटेल यांनी कायदेकर्त्यांना आश्वासन दिलं की जर त्यांची नियुक्ती झाली तर एफबीआयचे प्राधान्य सर्व समाजातील लोकांना सुरक्षित ठेवणे आणि भावी पिढीला मोकळं जीवन जगण्यासाठी उत्तम जागा करून देणं असेल.
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू काश पटेल यांना एफबीआय संचालक पदासाठी नामांकन देण्यात आलं आहे. याची घोषणा स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात हिंदुस्थान-अमेरिकन पेंटागॉनमधील अधिकारी काश पटेल यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. काश पटेल हे ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू समर्थक मानले जातात. पटेल यांनी अमेरिकन सरकारमधील ‘डिप स्टेट’ म्हणून वर्णन केलेल्या यंत्रणा नष्ट करण्याचीही वकिली केली आहे.
अमेरिकेत काश पटेल इतके महत्त्वाचे का आहे?
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) चे संचालक म्हणून नामांकन केलं आहे. ट्रम्प यांनी पटेल यांना ज्या एफबीआय संचालकपदासाठी नामांकन दिलं आहे ते पद सामान्यपणे 10 वर्षांच्या कालावधीसाठी भरले जाते. पटेल हे ट्रम्प प्रशासनात नियुक्त झालेले सर्वोच्च दर्जाचे हिंदुस्थानी-अमेरिकन आहेत. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर पटेल हे अमेरिकेच्या सर्वोच्च तपास संस्थेचे नेतृत्व करणारे पहिले हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन असतील. पटेल हे ट्रम्प यांचे निष्ठावंत समर्थक मानले जाणारे क्रिस्टोफर रे यांची जागा घेतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List