लाच प्रकरणातील कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन

गंजगाव वाळू घाटावरून कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहतूक करण्यासाठी 17 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना 23 जानेवारी रोजी रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. यातील सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांचे निलंबन करून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दैनिक सामनाशी बोलताना दिली आहे.
बिलोली तालुक्यातील गंजगाव वाळू घाटावरून कायदेशीर परवानगी असतानाही ठेकेदाराकडून 17 हजार रुपयांची लाच भागवत नागरगोजे व नारायण शिंदे यांनी मागितली होती. 17 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस ठाण्यातच दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ एसीबीच्या पथकाने पकडले होते. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर बिलोली येथील न्यायालयाने त्यांची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत केली असून त्यांच्या जामीन अर्जावर दि. 31 जानेवारी रोजी बिलोली येथील प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भागवत नागरगोजे व नारायण शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश काढून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.एकंदरीतच कुंडलवाडी पोलीस ठाण्यातच दोन पोलीस अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List