अभिनेत्री शर्लिन चोप्रा बनली आई? म्हणाली ‘एक असा आशीर्वाद..’
अभिनेत्री शर्लिन चोप्रा तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच शर्लिनला एका लहान बाळासोबत पाहिलं गेलं. तिचा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर हे बाळ कोणाचं आहे, शर्लिन बाळासोबत का फिरतेय, असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. शर्लिनने बाळाला दत्तक घेतल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या चर्चांवर तिने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. बुधवारी शर्लिनला मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटमधून लहान बाळासोबत बाहेर येताना पापाराझींनी पाहिलं. तेव्हापासून या चर्चांची सुरुवात झाली आहे.
शर्लिनने या बाळासोबत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही काही फोटो पोस्ट केले आहेत. ‘एक असा आशीर्वाद ज्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही’, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. त्यामुळे शर्लिन बाळाला दत्तक घेऊन आई बनली का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या बाळाचं नाव किंवा त्याबद्दलची कोणतीच माहिती अद्याप समोर आली नाही. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये पापाराझी तिला ‘मम्मी’ असंही बोलताना दिसत आहेत. त्यावरही ती कोणतीच नकारात्मक प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळे बाळाला दत्तक घेऊन ती खरंच आई बनल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.
याआधी दिलेल्या काही मुलाखतींमध्ये शर्लिन मातृत्वाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. “मला आई बनायचं आहे आणि त्यासाठी भारतात कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, याबद्दल मी जाणून घेतेय. मला किमान तीन ते चार मुलंबाळं हवी आहेत. माझ्या बाळाला मी ‘अ’ या अक्षरावरून नाव देईन. कारण मला हे अक्षर खूपच आवडतं”, असंदेखील ती म्हणाली होती.
शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केलंय. 2007 मध्ये ‘रेड स्वस्तिक’ या चित्रपटातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अमेरिकन ‘प्लेबॉय’ या मॅगझिन कव्हरवर फोटो झळकल्याने ती प्रकाशझोतात आली होती. शर्लिनने ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला’च्या सहाव्या सिझनचं सूत्रसंचालनसुद्धा केलंय. 2009 मध्ये तिने ‘बिग बॉस’मध्येही भाग घेतला होता.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List