लातूर पाठोपाठ नांदेड जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ चा प्रादुर्भाव; पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना
लातूर पाठोपाठ नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव झाला आहे. लोहा तालुक्यातील किवळा येथील दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. लोहा तालुक्यातील किवळा येथे मृत कुक्कुट पक्षांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले असून पशुसंवर्धन विभाग उपाययोजना राबवत आहे.
लोहा तालुक्यातील किवळा येथे कुक्कुट पक्षांमध्ये 20 जानेवारी रोजी मरतूक दिसून आला. यानंतर पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुक्कुट पक्षांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. हे नमुने पॉझिटिव्ह आले असून सदर कुक्कुट पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
खबरदारीच्या उपाययोजना म्हणून 565 कुक्कुट पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेतले असून त्यांची आता शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना तातडीने हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये किवळा येथील परिसर दहा किलोमीटरपर्यंत अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांना मनाई करण्यात आली असून, त्या ठिकाणची खाजगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्याबाबत आदेशित केले आहे. प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणे याच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांना तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे.
प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभावित क्षेत्रापासून 5 किमी परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने, कुक्कुट मांस विक्रीची दुकाने, वाहतूक, बाजार, यात्रा, प्रदर्शन आदी बाबी बंद राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये तसेच अफवा व गैरसमज पसरवू नये. तसेच जिल्ह्यात कुठेही पक्ष्यांमध्ये असाधारण मरतूक आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये किंवा 1962 या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List