अंगलट आलं की नाही म्हणायचं आणि चांगलं झालं की श्रेय लाटायचं, एसटी तिकिटाच्या दरवाढीवरून वडेट्टीवार यांचा घणाघात
राज्य परिवहन विभागाला कोणी वाली आहे की नाही असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला. तसेच कुठलाही निर्णय अंगलट आला की आपण हा निर्णय घेतला नाही, आणि एखादा निर्णय चांगला ठरला की त्याचे श्रेय लाटायचं अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
वडेट्टीवार म्हणाले की, एसटीच्या तिकिटांची दरवाढ सरकारने केली नाही हे मंत्र्यानींच मान्य केले आहे. सरकार म्हणून एसटीच्या तिकिटांची दरवाढ मग केली कोणी? कारण तिथे महामंडळ अध्यक्ष नाही. किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परवानगीशिवाय अशी दरवाढ करता येत नाही. ही दरवाढ आम्ही केली नसल्याचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
तसेच एसटी ही गरीब आणि मजुरांची जीवनवाहिनी आहे, ही दरवाढ मागे घेऊन यांना दिलासा द्यावा. या खात्याचा वाली कोण, हे खातं कोण चालवतंय उपमुख्यमंत्र्यांना माहित नाही, भाडेवाढ झाली हे मंत्र्यांना माहित नाही. ही सगळी खाती अधिकारी चालवतात आणि मंत्री घरी बसून आदेश काढतात असा याचा अर्थ होतो का? सरकारमध्ये हा पोरखेळ सुरू आहे. सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नाही. एसटी तिकिटाच्या दरवाढीचा निर्णय जर अधिकाऱ्य़ांनी घेतला असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार? ते कारवाईसाठी पात्र नाहीत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतील. म्हणून अंगलट आलं की नाही म्हणायचं आणि चांगलं झालं की श्रेय घ्यायचं अशा दुटप्पी भुमिकेतून या सरकारचं कामकाज सुरू आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List