Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; ११ जण ठार
जळगावच्या पाचोरा जवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या होत्या. मात्र त्याच वेळी भुसावळकडे जाणारी कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. या अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० ते ४० जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या भीषण अपघाताने जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याचे म्हटले जात आहे.
पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धुर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. त्याच वेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडल्याची घटना जळगाव येथे घडली आहे. या अपघातात ११ प्रवासी ठार झाल्याचे जिल्हाधिकाऱ्याने म्हटले आहे. जळगावातील पाचोरा येथील परधाडे येथे हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
असा झाला अपघात
ही ट्रेन परधाडे रेल्वे स्थानकाजवळ येत होती. तितक्यात पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एक्सप्रेसमधील लोक हादरून गेले. आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या. प्रवाशी या प्रकाराने चांगलेच हादरून गेले होते. त्यामुळे ३५ ते ४० प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारल्या. समोरून गाडी येते की नाही याची खातरजमाही त्यांनी केली नाही. तेवढ्यात समोरून कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. त्यात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात झाल्याचं काही लोक सांगत आहेत. अजून या घटनेची माहिती यायची बाकी आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
स्वप्नील लीला, मध्य रेल्वेचे सीपीआरओ
छत्रपती शिवाजी महाराज ट्रेनकडे येणारी ही पुष्पक एक्सप्रेस होती. ही पुष्पक एक्सप्रेस मायधी आणि परधाडे दरम्यान गाडी थांबली होती. त्यातील काही प्रवाशी खाली उतरले होते. त्याचवेळी भुसावळकडे जाणारी कर्नाटक एक्सप्रेसमुळे काही प्रवाशांना इजा झाली आहे. अशी प्राथमिक माहिती आली आहे. भुसावळवरून मेडिकल व्हॅन निघाली आहे. स्थानकाजवळच्या स्थानिक प्रशासनाला माहिती दिली आहे. जिवीत हानी झाल्याची माहिती नाही. वैद्यकीय मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी सांगितले आहे.
कम्युनिकेशन गॅपही
पुष्पक एक्सप्रेस ही भुसावळकडून मुंबईला येत असताना तिला कॉशन ऑर्डर म्हणजे काम सुरू असल्याने स्टॉप घेतला होता. पण कॉशन ऑर्डर घेतली असताना स्टेशनला गाडी थांबवली तर सूचना देऊन प्रवाशांना कळतं गाडी थांबली. काम सुरू आहे. पण ही गाडी स्टेशनजवळ न थांबवता जंगलात थांबवली. त्यामुळे काही प्रवाशी खाली उतरले. एका बाजूला ब्लॉक होता. दुर्देवाने दुसऱ्या बाजूने कर्नाटक एक्सप्रेस येत होती. तिने हॉर्न दिला नाही. तिला कॉशन ऑर्डरची माहिती नसावी. कुठे तरी कम्युनिकेशन गॅप दिसतो. हॉर्न किंवा सिग्नल नसल्याने प्रवाशी रेल्वे पटरीजवळ बसले होते. दहा ते १२ प्रवासी होते. त्यांना ऑन द स्पॉट उडवलं. आमचा कार्यकर्ता तिथे आहे. १२ प्रवाशांना पाचोऱ्याला शिफ्ट करण्यात आलं आहे. कॉशन ऑर्डर ही स्टेशनला घेतली असती तर अपघात झाला नसता. कम्युनिकेशन गॅपही दिसून येत आहे असा आरोप शिवसेना नेते उन्मेष पाटील यांनी केला आहे.
संदीप जाधव, प्रवासी बाईट
मुंबईकडे येत असताना ही घटना घडली. कोणी तरी ओरडलं गाडीला आग लागली. त्यामुळे लोकांनी उड्या मारल्या. दुसऱ्या ट्रॅकवरून बंगळुरू गाडी येत होती. त्यामुळे काही लोकं चिरडले. स्लीपरच्या दरवाजात लोक बसले होते. गाडीचा ब्रेक दाबल्याने आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यांनी आग लागली असं ओरडले. त्यामुळे लोकांनी उड्या मारल्या. साडे तीन ते चार वाजता ही घटना घडली. आता गाडी सुरू झाली आहे. पाचोरा स्टेशनला गाडी थांबली आहे. ही दुर्घटना दु:खद आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List