Bigg Boss 18: ग्रँड फिनालेमध्ये जाण्यासाठी ईशा सिंहची निर्मात्यांसोबत डील, दिली 30% टक्के फी? जाणून घ्या सत्य..
‘बिग बॉस 18’मध्ये एकूण 23 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी फक्त सहाच जण ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचू शकले. प्रत्येक आठवड्याला झालेले टास्क, त्या टास्कदरम्यान मारलेली बाजी, स्पर्धकांकडून मिळालेले वोट्स आणि एकंदरीत लोकप्रियता या सर्व निकषांच्या आधारावर स्पर्धक बिग बॉसच्या घरात टिकले. टॉप 6 स्पर्धकांमध्ये ईशा सिंह, विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि रजत दलाल यांचा समावेश होता. यापैकी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री ईशा सिंह विविध कारणांमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत राहिली. काहींनी तिला ‘बिग बॉसची लाडकी’ असं म्हटलं, तर काहींनी तिच्यावर ‘चुगली आंटी’ म्हणत टीका केली. ईशाला या सिझनची सर्वाधिक ट्रोल झालेली स्पर्धक असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ईशाचा आतापर्यंतचा बिग बॉसच्या घरातील प्रवास कसाही राहिला असला तरी टॉप 6 मध्ये तिने आपलं स्थान निश्चित केलं.
नुकताच असा दावा झाला की ग्रँड फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी ईशा सिंहने बिग बॉसच्या निर्मात्यांसोबत मोठी डील केली. या डीलनुसार ईशाने तिच्या ‘बिग बॉस 18’द्वारे झालेल्या कमाईमधून 30 टक्के भाग निर्मात्यांना दिला. या चर्चांना ईशाच्या कुटुंबीयांनी आणि तिच्या टीमने नाकारलं आहे. ईशाच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी सत्य समोर आणलं आहे. “ईशाने फिनालेमध्ये जाण्यासाठी निर्मात्यांना 30 टक्के मानधन दिल्याच्या चर्चा खोट्या आहेत. अशा चर्चांमुळे तिने गेल्या अनेक वर्षांपासून केलेली मेहनत आणि कामाप्रती तिची निष्ठा यांचा अपमान होतो. तिने तिच्या प्रतिभेच्या, मेहनतीच्या जोरावर बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय”, असं ईशाच्या टीमने स्पष्ट केलंय.
ईशाच्या कुटुंबीयांनीही तिच्याविरोधात अशा चर्चा पसरवणाऱ्यांवर टीका केली आहे. “ईशाबद्दल असं काहीही बोलण्याआधी एकदा नीट विचार करा. तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर करिअरमध्ये यश मिळवलं आहे”, असं त्यांनी म्हटलंय. ‘बिग बॉस 18’च्या मीडिया राऊंड 2 मध्ये ईशाला पाठिंबा देण्यासाठी तिचा भाऊ बिग बॉसच्या घरात पोहोचला होता. मात्र ईशाला ‘बिग बॉस 18’ची ट्रॉफी पटकावता आली नाही. टॉप 6 पर्यंतच तिचा प्रवास होता. प्रेक्षकांकडून कमी मतं मिळाल्याने ईशा सहाव्या स्थानीच बाद झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List