नानांच्या गावाला जाऊयात; दगडांचा वाडा, शेत, सुसज्ज गोठे, भली मोठी विहीर; नानांच्या शेतघराची सर्वांनाच भुरळ
नाना पाटेकर हे नाव बॉलिवूडपासून ते मराठीचित्रपटसृष्टीतही तेवढच प्रसिद्ध आहे. नाना पाटेकरांच्या चित्रपटाप्रमाणेच, त्यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांचे साधे राहाणीमान आणि त्यांचे गाववरचे प्रेम याबद्दलही सर्वांना कौतुक आहे. पण त्याहून जास्त चर्चा होते ती नाना पाटेकर यांच्या गावाकडील शेतघर किंवा फार्महाऊसची. तसं अनेक मराठी सेलिब्रिटींनी त्यांच्या फार्महाउसला भेट दिली आहे
मुंबईची गर्दी आणि उंच उंच इमारती पाहून त्यांची घुसमट व्हायची. त्याचमुळे गेल्या 15 वर्षांपासून ते पुण्यातील त्यांच्या कुटुंबासह शेतघरात राहायला गेले आहेत. ‘नानाची वाडी’ या नावाने त्यांचं पुण्यातील खडकवासला येथील डोणजे या गावात शेतघर आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या 7 ते 8 एकर क्षेत्रावर त्यांनी ही शेती केली आहे.
इथे तांदूळ, हळद अशी पिकं ते घेतात. भली मोठी विहीर, घराच्या परिसरात असलेले सिमेंटचे रस्ते, दगडी बांधकाम असलेलं भलं मोठं शेतघर, घराभोवती फळा फुलांची झाडं, जनावरांसाठी गोठा अशी रचना त्यांनी करून घेतली आहे. त्यांच्या या शेतघराची अनेक सेलिब्रिटींना भुरळ पडली आहे तर राजकीय नेत्यांनीही इथे हजेरी लावलेली पाहायला मिळाली.
नानाची वाडी म्हटलं की सर्वांनाच आकर्षण, त्या वाडीत पसरलेले शेत, मळे, वाफे आहेत, छान सुंदर रस्ते आहेत, एक तलाव आहे, त्यात मासे बदके सोडलेली आहेत, फळाफुलांनी बहरलेली झाडे आहेत,कोंबड्यांची सुशोभित खुराडी आहेत, प्रशस्त आणि सुसज्ज गोठे आहेत, खिल्लारी उंचीपुरी बैलजोडी आहे, त्यांच्यासाठी बैलगाडी आहे. त्या बैलगाडीच्या जोखडाच्या पुढच्या टोकावर 'नानाची वाडी'चा डिझाईन केलेला सिम्बॉल आहे.
पण तिथे कोणीही राखणदारीला माणूस किंवा वॉचमन नाही. तर शेतात फिरणारे मालकाच्या जिव्हाळ्याचे चार-पाच कुत्रे घराच्या प्रवेशद्वारावरच बसलेले असतात. विना परवानगी आत घुसणार्याची हिंमत मात्र कोणाचीच नसते. जेव्हा नानांचा आतून आवाज त्यांना येतो की 'एऽऽऽ येऊ दे त्यांना आत…’ तेव्हा ते हे वॉचमन शांत होतात आणि त्या पाहुण्यांना आत जाऊ देतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List