Narendra Modi : नौदलाच्या जहाजांचे लोकार्पण, इस्कॉन मंदिरातही जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, कसा असेल दौरा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे. आज ते मुंबई आणि नवी मुंबईत उपस्थित राहणार आहेत, तसेच विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रथमच ते महायुतीच्या आमदारांसोबत संवादही साधणार आहेत.
भारतीय नौदलाच्या जहाजांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर याचं या युद्धनौका आजपासून भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होतील. 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते, त्यानंतर आज ते पुन्हा, दुसऱ्यांदा मुंबईत येणार आहेत. तसेच इस्कॉन मंदिराचा आज लोकार्पण आहे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खारघर मध्येही येणार आहेत.
कसा असेल पंतप्रधानांचा कार्यक्रम ?
मुंबईच्या नौदल गोदीत पंतप्रधानांच्या हस्ते सकाळी 10.30 च्या सुमारास आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण होईल. भारतीय नौदलाचे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला आपल्या कुटुंबासमवेत दाखल व्हायला सुरवात झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाहनाना प्रवेश नसल्याने नौदलाच्या वाहनांनी निमंत्रीतांना आणलं जात आहे. नेव्हीच्या टायगर प्रवेश द्वारावरून सर्वांना मुख्य कार्यक्रमासाठी सोडलं जात आहे.
तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टीकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप आहे. आयएनएस सूरत, P15B हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे आणि सर्वोत्तम जहाज असून, जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यातील 75% सामग्री स्वदेशी असून अत्याधुनिक शस्त्र-सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी ते सुसज्ज आहे. आयएनएस निलगिरी, हे P17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकारातील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा (सीकीपिंग) आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. जे स्वदेशी फ्रिगेट्सच्या आधुनिक प्रकाराचे प्रतिबिंब दर्शवितात. आयएनएस वाघशीर, P75 स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी असून,पाणबुडी बांधणीतील भारताच्या वाढत्या कौशल्याचे ती प्रतिनिधित्व करते. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे.
आमदारांना काय देणार कानमंत्र ?
तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण झाल्यानतंर पंतप्रधान मोदी हे महायुतीचे मंत्री तसेच आमदारांशी संवाद साधतील, त्यांना मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मोदी मंत्र्यांसह आमदारांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी आज प्रामुख्यामे पहिल्यांदाच महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. दुपारी 12.15 ते 2.45 ( सव्वाबारा ते दुपारी पावणेतीन) अशी संवादाची वेळ असेल. यावेळी महायुतीच्या सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघातील काही विषयांबद्दल विचारणा करण्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे, जनतेशी तुम्ही संवाद कसा साधता, हा प्रश्नही पंतप्रधान मोदी प्रामुख्याने विचारणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांचा क्लास घेतील, असं दिसतंय. आंग्रे सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात ते सर्वांशी संवाद साधतील. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, त्या कशा पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचवता ? हा प्रश्नही पंतप्रधानांकडून विचारण्यात जाईल.
विशेष बसने जाणार, मोबाईललाही बंदी
सुरक्षेच्या कारणास्तव नौदल गोदीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्याशिवाय इतर कोणत्याही वाहनांना परवानगी नसेल. पंतप्रधानांच्या भेटीमुळे दक्षिण मुंबईत होणारी संभाव्य वाहतूककोंडी होण्याची शक्यता असून, ते लक्षात घेऊन आमदारांनाही त्या परिसरात आपली वाहने घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे आमदारांना गोदीमध्ये घेऊन जाण्यासाठी विशेष बसची व्यवस्था विधानभवनात करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हे मंत्री, आमदारांना मार्गदर्शन करतील तेव्हा, तसेच दुपारच्या भोजनावेळीही कोणालाही मोबाईल जवळ बाळगता येणार नाही. सर्व आमदारांना मोबाईल हे गेटवर जमा करावे लागणार आहेत.
इस्कॉन मंदिराचे आज लोकार्पण
तर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकर्पण होणार आहे. इस्कॉन मंदिराच्या काही अंतरावरती हेलिपॅड तयार करण्यात आले असून या हेलिपॅड वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन वाजता येणार आहेत व खारघर मधील इस्कॉन मंदिराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडेल. हेलिपॅड वरती सध्या पाणी मारलं जात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलीस देखील सज्ज आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत संपूर्ण खारघर मध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे हार्दिक स्वागत अशा आशयाचे बॅनर अनेक ठिकाणी दिसत आहेत. खारघ मध्ये प्रत्येक चौका चौकात हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. नऊ एकरांवर वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे, वैदिक शिक्षणाचे केंद्र, प्रस्तावित वस्तुसंग्रहालय, सभागृह, आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. या भव्य मंदिराचे बांधकाम गेल्या 12 वर्षांपासून सुरू होते, ते आता पूर्ण झाले आहे. हे मंदिर पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी बांधलेले आहे. विश्वबंधुत्व, शांतता आणि सौहार्द वाढवणे हे वैदिक शिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे…
भारतातील इस्कॉन मंदिरांची संख्या
इस्कॉनची सुरुवात भारतात 1966 मध्ये एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी केली होती. सध्या भारतात 400 हून अधिक इस्कॉन मंदिरे आणि केंद्रे आहेत. यापैकी प्रमुख मंदिरे दिल्ली, वृंदावन, मायापूर, बंगलोर आणि मुंबई येथे आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List