मेघा इंजिनिअरिंग आणि नवयुगा कंपनीचा राज्यात टेंडर घोटाळा, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
राज्यातील अनेक सार्वजनिक बांधकामांचे टेंडर हे मेघा इंजिनिअरिंग आणि नवयुगा कंपनीला दिले जात असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यानी ट्विटरवर टेंडर्सचा एक तक्ता दिला असून त्यात एक टेंडर मेघा इंजिनिअरिंगला तर एक टेंडर नवयुगा कंपनीला दिले जात असल्याचे समोर आले आहे. एका पाठोपाठ एक सगळे टेंडर आलटून पालटून या दोन कंपनीलाच मिळाल्याचे समोर आले आहे.
याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट व त्या टेंडर फाईल्सचे फोटो शेअर केले आहेत. ”पुणे रिंग रोडच्या निविदेची यादी आणि कंपन्यांची नावे टाकतोय. सध्या महाराष्ट्रात कामे करताना दोनच कंपन्या समोर येताहेत, मेघा इंजिनिअरिंग आणि नवयुगा ! नवयुगाचा अनुभव महाराष्ट्राला चांगला आहे, असे काही मला वाटत नाही. समृद्धी महामार्गावर त्यांनी बांधलेला पूल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 24 तासातच कोसळला होता. त्याच कंपनीने हिमाचल प्रदेशात एक बोगदा बांधण्याचे काम केले होते. बोगदा बांधत असतानाच तो बोगदा कोसळून 60 मजूर आत अडकले होते. उंदरांनी एखादी वस्तू कुरतडावी, या पद्धतीने तेथील काही जणांनी कोसळलेला बोगदा कुरतडून साठ जणांना त्या संकटातून बाहेर काढले होते, ही नवयुगाची माहिती! मेघा इंजिनिअरिंग आणि नवयुगा यांच्यातच स्पर्धा आहे. स्पर्धा म्हणजे काय तर एक तू घे… दुसरे मी घेतो. तिसरे मी घेतो… चौथे तू घे, अशी स्पर्धा आहे आणि बाकीच्यांनी निविदा भरू नयेत म्हणून त्यांना अगदी वरिष्ठ पातळीवरून फोन जाताहेत. या दोघांनी टेंडर भरताना 40 टक्क्यांच्या वर भाव दिलेले आहेत. हा 200% स्कॅमच आहे. अशा अनेक गोष्टी मागील सहा महिन्यात सरकारने केलेल्या आहेत. आता हळूहळू हे सर्व उघडकीस येतेय. हा घ्या टेंडरचा तक्ता, भाव आणि कंपन्यांचे नाव”, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List