“ती मला दांडक्याने मारायची..”; जेव्हा श्वेता तिवारीच्या पूर्व पतीने केले होते आरोप
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. श्वेताने दोनदा लग्न केलं. मात्र दोन्ही वेळा तिचा संसार टिकला नाही. तिने अभिनेता राजा चौधरीशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर अभिनव कोहलीशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. श्वेताने तिच्या दोन्ही पतींवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. राजा चौधरीला घटस्फोट दिल्याच्या काही काळानंतर तिने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगासुद्धा आहे. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच दोघं विभक्त झाले. श्वेताने अभिनव विरोधात पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केल होती. तिने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. मात्र नंतर अभिनवने आपली बाजू मांडली तेव्हा त्याने श्वेतावरच काही धक्कादायक आरोप केले होते.
एका मुलाखतीत अभिनव म्हणाला होता, “मी कधीच श्वेतावर हात उचलला नाही. पलकने खुल्या पत्रात याचा उल्लेख केला होता, पण मी तसं कधीच वागलो नाही. मी कानाखाली वाजवल्यासाठी दोनदा तिची माफी मागितली होती. मात्र श्वेताने माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. माझ्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप सिद्ध होण्यासाठी ती असं म्हणतेय, पण यात तथ्य काहीच नाही. मी कधीच महिलेवर हात उचलला नाही. किंबहुना त्या दाव्यांविरोधात श्वेतानेच मला दांडक्याने मारलं होतं. मी कोणालाच मारलं नव्हतं, पण श्वेताने माझ्यावर हात उचलला होता. तिने तिच्या मुलीचा वापर करून माझ्यावर चुकीचे आरोप लावले. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.”
जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर श्वेता आणि अभिनवने 2013 मध्ये लग्न केलं होतं. ‘जाने क्या बात हुई’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. लग्नानंतर या दोघांना रेयांश हा मुलगा झाला. मात्र मुलाच्या जन्मानंतरच त्यांच्यात भांडणं होऊ लागली होती. मुलाला एकटं घरी सोडून श्वेता ‘खतरों के खिलाडी’ या शोच्या शूटिंगसाठी केपटाऊनला निघून गेल्याचा आरोप अभिनवने केला होता. त्यानंतर श्वेताने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अभिनववर काही आरोप केले होते. श्वेताची मुलगी पलकनेही समोर येत अभिनववर निशाणा साधला होता. अखेर ऑगस्ट 2019 मध्ये श्वेताना अभिनवविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List