वसंत तावडे यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली! प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
साहित्यसेवक वसंत तावडे यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली. मेहनत करणे हा त्यांच्या स्थायी स्वभाव होता. प्रबोधन संस्थेच्या उभारणीत त्यांच्या मोठा वाटा होता. मी त्यांची सावली म्हणून काम केले, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी वसंत तावडे यांच्या कार्याचा गौरव केला.
प्रबोधन गोरेगाव आणि साप्ताहिक ‘मार्मिक’ यांच्या वतीने साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळय़ात अध्यक्ष म्हणून देसाई बोलत होते. वसंत तावडे हे स्वतः क्रिशाशील होते आणि दुसऱयालासुद्धा कामात गुंतवायचे. त्यांच्या अनेक साहित्यिक व लेखकांच्या ओळखी होत्या. त्यांच्यामुळे आम्हाला साहित्याची व वाचनाची आवड निर्माण झाली. दरवर्षी होणाऱया ठिकठिकाणच्या मराठी साहित्य संमेलनाला ते आम्हा प्रबोधन गोरेगावच्या सहकार्यांना आवर्जून घेऊन जात असत, अशी आठवण सुभाष देसाई यांनी सांगितली. साप्ताहिक ‘मार्मिक’ हा शिवसेनाप्रमुखांचा वारसा असून ज्ञानाचा खजिना आहे. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद बघता मराठी भाषा लयाला गेली नाही हे सिद्ध झाले, असे साप्ताहिक ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी म्हटले. यावेळी प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे उपस्थित होते. डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘मन करा रे प्रसन्न’ या कार्यक्रमातून भाष्य केले. प्रबोधन गोरेगावचे कार्यवाह गोविंद गावडे आणि सदस्य विजय नाडकर्णी यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.
सेवाकार्य माणुसकी धर्म जपणारे
प्रबोधन गोरेगाव संस्थेने इनडोअर गेम्स, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्वीमिंग पूल, धनुर्विद्या कक्ष, रक्तपेढी, जेनेरिक औषधांच्या दुकानांची साखळी उभी करून त्यातून माणुसकीचा धर्म जपला जात आहे. सुभाष देसाई यांनी उभारलेले हे रचनात्मक, संस्थात्मक, प्रबोधनात्मक सेवाकार्य चिरकाल टिकणारे असून हे सेवाकार्य साऱया देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील व त्यातूनच प्रबोधनकारी सकस विचारांची पिढी घडेल. देशाच्या नावलौकिकात भर पडेल, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश सावंत यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List