जेजुरीच्या गाढव बाजारात कोटय़वधींची उलाढाल, काठेवाडी गाढवाने खाल्ला एक लाखाचा भाव
>>प्रकाश खाडे
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये पौष पौर्णिमेनिमित्त पारंपरिक गाढव बाजार भरला आहे. दोन दिवसांपासून भरलेल्या गाढव बाजारामध्ये कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाली. गावठी गाढवांना तीस ते चाळीस हजार रुपये, तर काठेवाडी गाढवाला एक लाख रुपयांचा भाव मिळाला.
राज्याच्या विविध भागातून वैदू, पैकाडी, कोल्हाटी, कुंभार, माती वडार, मदारी, डोंबारी, गारुडी आदी समाजबांधव गाढव खरेदीसाठी जेजुरीत मुक्कामी आले आहेत. बाजारात सहाशे गावठी गाढवे, तर गुजरातमधील काठेवाड, राजकोट, सौराष्ट्र, भावनगर, अमरेली आदी भागातून शंभरच्या वर काठेवाडी गाढवे व्यापाऱ्यांनी विक्रीस आणली होती. ही गाढवे गावठी गाढवांच्या तुलनेत दिसायला उंची पुरी व कामाला दणकट असतात. एकावेळी 50 ते 60 किलोचा बोजा वाहून नेण्याची त्यांची क्षमता असते. त्यामुळे त्यांची किंमत जास्त असते. खरेदीसाठी आलेले व्यापारी दात पाहूनच किंमत ठरवतात. दोन दाताच्या गाढवांना दुवान, चार दाताच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड जवान असे निकष लावले जातात.
आधुनिक यंत्र युगामध्ये गाढवांचे महत्त्व कमी होऊ लागले आहे; मात्र डोंगरदऱ्यांमध्ये, अडचणीच्या ठिकाणी सिमेंट, वाळू, मुरूम व इतर अवजड सामान वाहून नेण्यासाठी गाढवांची गरज लागतेच. प्रामुख्याने वीटभट्टी, बांधकाम व शेतीच्या कामासाठी अजूनही गाढवांचा उपयोग केला जात आहे. अनेक आजारांवर गाढविणीचे दूध औषध म्हणून वापरले जाते. या दुधाचा भावही साडेतीन ते चार हजार रुपये लिटर असतो. गाढव बाजारात खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार उधारीवर झाले. कोणतीही लिखापडी न करता विश्वासावरच पुढच्या बाजारच्या वेळी पैसे दिले जातात. नगर जिह्यातील मढी व धाराशिव जिह्यातील सोनोरी येथे असेच पारंपरिक गाढव बाजार भरतात. जेजुरीच्या गाढव बाजाराला जागा कमी पडत असल्याने भटक्या विमुक्त समाज बांधवांमध्ये नाराजी आहे. सोमवारी मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रामा यल्लप्पा काळे यांनी दिली.
आंध्र प्रदेशच्या व्यापाऱ्यांना बंदी
काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातून अनेक व्यापारी मांस विक्रीसाठी गाढव खरेदी करीत होते; मात्र हे लक्षात आल्याने आम्ही संघटित होऊन त्यांच्या या प्रकाराला विरोध केला. त्यामुळे ते व्यापारी आता इकडे फिरकत नाहीत. केवळ व्यवसायासाठीच आम्ही गाढवांचे खरेदी विक्री व्यवहार करतो, असे सुभाष गायकवाड यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List