निकोप लोकशाहीसाठी विरोधी पक्षनेता आवश्यक, सरकार सकारात्मक निर्णय घ्यावा; अंबादास दानवे यांचे मत
निकोप लोकशाहीसाठी राज्यात विधानसभेत विरोधी पक्षनेता हे पद महत्त्वाचे आहे. त्यामुळे याबाबत सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीकडे विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक संख्याबळ नाही. मात्र, विधानसभेत विरोधी पक्ष नेता असावा अशी मागणी महाविकास आघाडीकडून केली जात आहे. याबाबत अंबादास दानवे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
निकोप लोकशाहीसाठी विधानसभेत विरोधी पक्षनेता अत्यंत आवश्यक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. देशात अनेक ठिकाणी विरोधी पक्षाचे मोजकेच आमदार असताना विरोधी पक्षनेतेपद विरोधी पक्षांना देण्यात आले आहे. महाराष्ट्रातही यापूर्वी असेच घडले आहे. त्यामुळे महायुती सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा तसेच घडवेल, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेतेपदाबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास, महाविकास आघाडीतून विरोधी पक्षनेता कोण होईल, कोणत्या पक्षाचा होईल या संदर्भात निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होईल. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते यासंदर्भात मिळून निर्णय घेतील. तो निर्णय सर्वांना मान्य राहील, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List