प्रभूदेवाला डेट करताना इंडस्ट्री का सोडली? अखेर नयनताराकडून खुलासा
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा पडद्यावरील तिच्या पॉवरफुल भूमिकांमुळे ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखली जाते. 2011 मध्ये इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या दोन वर्षांनंतर तिने दमदार कमबॅक केलं होतं. तेव्हा तिला ही नवी ओळख मिळाली होती. नयनताराने आता दिग्दर्शक विग्नेश शिवन याच्याशी लग्न केलं असून त्यांना दोन जुळी मुलं आहेत. नयनताराच्या आयुष्यात विग्नेश येण्याआधी ती कोरिओग्राफर, डान्सर आणि दिग्दर्शक प्रभूदेवाला डेट करत होती. प्रभूदेवाच्या प्रेमापोटीच तिने त्यावेळी अभिनय क्षेत्रातील करिअर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा नयनताराने केला आहे.
‘द हॉलिवूड रिपोर्टर’ला दिलेल्या मुलाखतीत नयनतारा म्हणाली, “मी अशा टप्प्यावर होती जिथे मला वाटलं की जर माझ्या आयुष्यात मला प्रेम हवं असेल तर काही त्यागसुद्धा करावा लागेल. त्यावेळी मी खूप संवेदनशील आणि तरुण होती. आमच्या इंडस्ट्रीत मी बरेच रिलेशनशिप्स पाहिले आहेत. मी त्यांना वाईट म्हणत नाहीये पण हे अशाच पद्धतीने चालत असल्याचं आम्ही पाहिलंय. त्यामुळे त्यावेळी मला वाटलं की ठीक आहे. माझ्या आतील प्रामाणिक मुलीला असं वाटलं होतं की जर तुला प्रेम हवं असेल तर कुठेतरी तडजोड करावीच लागेल. तुला तुझं सर्वकाही द्यावं लागेल. जर तुमच्या जोडीदारा तुम्ही करत असलेली एखादी गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही त्याचा त्याग केला पाहिजे. त्यावेळी प्रेम म्हणजे माझा असा समज होता.”
प्रभूदेवासोबतच्या नात्यामुळे नयनताराने जरी इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला असला तरी त्या नात्यामुळे माझं भलंच झालं, अशी भावना नयनताराने यावेळी व्यक्त केली. “आज मी ज्याठिकाणी आहे, ते त्याच रिलेशनशिपमुळे आहे. जर ते नातं नसतं, तर मला इथपर्यंत पोहोचायची ताकद मिळाली नसती असं वाटतं. माझ्यात नेमकी किती क्षमता आहे, हे मला समजलं नसतं. त्या नात्यानंतर मी आता पूर्णपणे वेगळी व्यक्ती आहे”, अशी कबुली नयनताराने दिली.
“सिनेमा हा फक्त व्यवसाय नाही हे मला समजलं. हे फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही. पण ही एक अशी गोष्ट आहे, जी माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनली आहे. मी हेच करण्यासाठी जन्मले आहे. अखेरचा जेव्हा मी ‘श्री राम राज्यम’ हा चित्रपट केला, तेव्हा मला जाणवलं की मी चित्रपटांपासून दूर राहूच शकत नाही”, असं नयनताराने स्पष्ट केलं. 2011 मध्ये नयनताराने इंडस्ट्री सोडली होती. नंतर तेव्हा तिचं आणि प्रभूदेवाचं ब्रेकअप झालं, तेव्हा 2013 मध्ये तिने कमबॅक केलं. विग्नेश शिवनला भेटल्यानंतर नयनताराची प्रेमाबद्दलची संकल्पना पूर्णपणे बदलली. आयुष्यात योग्य व्यक्ती आली की सर्वकाही ठीक होतं, असं ती म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List