मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? शिवसेनेच्या बड्या नेत्याने सांगितली तारीख
Maharashtra Cabinet Expansion: राज्यात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. त्यानंतर आता फडणवीस मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरु आहे. परंतु अजूनही अंतिम निर्णय झाला नाही. अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार बुधवारी दिल्लीत जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाची माहिती दिली आहे. येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे दिसत आहे. त्यासाठी राज्याचे तीन प्रमुख नेते दिल्ली जात आहेत. त्यामुळे काहीतरी महत्त्वाचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.
अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार
राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर होणार आहे. त्या अधिवेशापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे बोलले जात आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले. तुम्हाला मंत्रिपद मिळणार का? या प्रश्नावर संजय शिरसाट म्हणाले, माझ्या फार काही अपेक्षा नाहीत. मंत्रिपदाबाबत शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील.
तिन्ही पक्षांच्या नेत्यांना अधिकार
कुणी काय निर्णय घ्यायचा हा संपूर्ण अधिकार या तिन्ही प्रमुख नेत्यांना आहे. त्यात कुणाचाही काही चालणार नाही. भाजप आमदारांची सदस्य संख्या जास्त आहे. त्यामुळे संभ्रम कुठलाही नाही. त्यांना अधिक संधी मिळावी, ही अपेक्षा प्रत्येकाची आहे. निर्णय घेताना थोडीशी कसरत निश्चित होत आहे. पण आता कुठलाही घोळ नाही, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
काही आमदार, खासदार भाजपच्या संपर्कात
विकास कामांमध्ये अडथळा येऊ नये, या भावनेतून प्रत्येक आमदाराला वाटते की आपण सरकार सोबत जावे. आमदारांना आपआपल्या मतदारसंघाचे काम करून घ्यायची आहेत. त्यामुळे बरेचशे नेते खासदार, आमदार आमच्या देखील संपर्क आहेत. भाजपाच्याही संपर्कात आहे. त्यासंदर्भातील चित्र येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. ईव्हीएमच्या नावाने विरोधकांची स्टंटबाजी करतात जे चुकीचा आहे. लोकसभेमध्ये ईव्हीएम चांगला विधानसभेमध्ये नौटंकी सुरु केली आहे, असा प्रकार ते करत आहे, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List