ड्रायव्हिंग टेस्टमधील बोगसगिरीला लगाम, सुधारित नियमावलीत कडक निर्बंध
ड्रायव्हिंग टेस्ट (पर्मनंट लायसन्स) देण्यासाठी आलेले उमेदवार आणि त्यांची टेस्ट घेणारे अधिकारी यांच्या कार्यपद्धतीबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने आता नियर्मात सुधारणा करून नियम कठोर केले आहेत. यामध्ये टेस्ट घेणाऱ्या अधिकाऱ्याने हजेरीपटावर नोंद केल्याशिवाय टेस्ट घेऊ नये, तसेच टेस्ट देण्यासाठी आलेल्या उमेदवाराच्या वाहन क्रमांकाची नोंद घेणे याशिवाय ड्रायव्हिंग स्कूलमार्फत आलेल्या उमेदवाराचीदेखील नोंद घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे ड्रायव्हिंग टेस्ट प्रक्रियेत पारदर्शकता येऊन यातील बोगसगिरीला चाप बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
परिवहन विभागाकडून अनेक सुधारणा करूनही आरटीओमध्ये होत असलेले फेरफार अद्यापि कमी झालेले नाहीत. ड्रायव्हिंग टेस्ट प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने अनेकदा बोगस लायसन्स दिली जातात. दुचाकी टेस्ट देण्यासाठी आलेला उमेदवार टेस्ट ट्रॅकच्या ठिकाणी अनेकदा मिळेल ती दुचाकी घेऊन टेस्ट देतो. संबंधित उमेदवाराने कुठल्या दुचाकीवरून टेस्ट दिली? त्याचा वाहन नंबर, याची सध्यातरी नोंद होत नाही. त्यामुळे अनेकदा उमेदवाराने टेस्ट खरेच दिली की नाही, हे तपासण्याची यंत्रणा नाही. असाच प्रकार चारचाकी वाहन टेस्टिंगमध्येदेखील आहे. एकूणच या प्रक्रियेत पूर्णतः पारदर्शकता नाही. दरम्यान, अशाच प्रकारे मुंबईतील अंधेरी आरटीओ कार्यालयातून देण्यात आलेल्या ड्रायव्हिंग लायसन्समध्ये अनियमितता झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेत्याने केला होता. लाइट मोटार व्हेईकलसाठी (कार) ड्रायव्हिंग लायसन्स जारी करताना दुचाकी वाहनांवर टेस्ट घेण्यात आल्या. तर, लाइट मोटार व्हेईकलवर ड्रायव्हिंग टेस्ट घेऊन मोटारसायकल, तसेच स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आल्याचा आरोपदेखील करण्यात आला होता.
या सर्व पाश्र्वभूमीवर आता परिवहन आयुक्त कार्यालयाने सुधारित नियमावली काढली असून, त्यामध्ये ड्रायव्हिंग टेस्टचे (पर्मनंट लायसन्स) नियम कडक करण्यात आले आहे. कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवावी, याबाबत सहपरिवहन आयुक्त (प्रशासन) संजय मेत्रेवार यांनी आदेश दिले आहेत. या प्रक्रियेत चोरी-छुप्या पद्धतीने होणाऱ्या बोगसगिरीला चाप लावण्यात आला आहे. परिणामी, आतातरी या प्रक्रियेत पारदर्शकता येणार का? हे आगामी काळात समोर येईल.
परिपत्रकात नेमके काय?
■ पक्के लायसन्स टेस्ट घेण्यासाठी ज्यांची नियुक्ती असेल, अशा सर्व मोटार, सहमोटार वाहन निरीक्षकांनी हजेरीपटावर नोंद केल्याशिवाय चाचणी घेण्यासाठी मैदानात जाऊ नये. चाचणीसाठी आलेल्या उमेदवाराची विस्तारित आवश्यक माहिती म्हणजेच नाव, अर्ज क्रमांक, उमेदवाराची सही, वाहन संवर्ग आदींची माहिती घेण्यात यावी. चाचणी घेतल्यानंतर ज्या संवर्गासाठी चाचणी घेतली, त्याची नोंद, तसेच परीक्षेचा निकाल व चाचणी घेणाऱ्याची सही, प्रत्येक अधिकाऱ्याने संगणकावर ड्रायव्हिंग टेस्टची एण्ट्री करताना योग्य संवर्गासमोर त्याच संवर्गातील वाहनाचा क्रमांक लिहिण्यात आल्याची खात्री करावी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List