Kurla Bus Accident : कुर्ल्याच्या एलबीएस मार्गावर थरार, भरधाव बसची अनेकांना धडक; चौघांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी
वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांनी सदैव गजबजलेला असलेल्या कुल्र्याच्या एलबीएस मार्गावर आज संध्याकाळी थरारक घटना घडली. भरधाव बेस्ट बसने दुचाकी, चारचाकी वाहनांना धडक देत काही नागरिकांना चिरडले. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर 20 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले. जखमींवर कुर्ल्याच्या भाभा इस्पितळात उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कुर्ला आणि आजूबाजुचा परिसर बेस्ट बसच्या अपघाताने हादरला. बेस्टची 332 क्रमांकाची बस कुल्र्याहून अंधेरीच्या दिशेने निघाली होती. पण एलबीएस मार्गावरील रहदारीच्या ठिकाणी येताच भरधाव बसने रस्त्यावरील दुचाकी, चारचाकींचा धडक देत पादचाऱ्यांना अक्षरश चिरडले. हा अपघात इतका भयंकर होता कि परिसरात एकच हाहाकार उडाला. नागरिक गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावरच आडवे पडले होते. तर गाड्या आणि नागरिकांना धडक देत बस आंबेडकर नगर येथे एका ठिकाणी जाऊन थांबली. पण यात 20 हून अधिक जण जखमी झाल्याने त्या सर्वांना तत्काळ भाभा इस्पितळात नेण्यात आले. मात्र दुर्देवाने त्यातील चौघा जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर उर्वरित जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता कि काही क्षणासाठी नेमके काय झाले हे लोकांना कळलेच नाही. भयंकर आवाजाने लोकं सैरावैरा पळत सुटले. अखेर सुसाट बस अनेकांना धडक देत एकेठिकाणी जाऊन थांबल्यानंतर नागरिकांनी जखमींना मदतीचा हात देण्यासाठी धाव घेतली.
दरम्यान, अपघातानंतर कुर्ला पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले. बसचा ब्रेक पेâल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत असल्याचे कुर्ला पोलीसांच्या सुत्रांकडून सांगण्यात येते. चालकांने मद्यपान केले होते का ते मात्र उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी कुर्ला पोलीस अधिकचा तपास करीत आहेत. अपघातात रिक्षा तसेच काही खासगी वाहंनांचे प्रचंड नुकसान झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List