“या दलदलीत मला पडायचं नाही..”; सूरजसोबतच्या वादावर अंकिताने स्पष्ट केली तिची बाजू
‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर उर्फ ‘कोकण हार्टेड गर्ल’ यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सूरजसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले होते. कोलॅबरेशन असल्याने तेच फोटो आणि व्हिडीओ सूरजच्याही अकाऊंटवर दिसत होतो. मात्र काही तासांनंतर ते सर्व सूरजच्या अकाऊंटवर काढून टाकण्यात आले. अंकिताला अनफॉलो करण्यात आलं होतं. हे सर्व सूरज नाही तर त्याच्या आजूबाजूची लोकं करत आहेत, असा आरोप अंकिताने केला आहे. तिने तिची बाजू मांडण्यासाठी युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताने संपूर्ण प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्याचसोबत मला या दलदलीत पडायचं नाहीये, यापुढे मी या विषयावर काहीच बोलणार नाही, असंही तिने स्पष्ट केलंय.
काय म्हणाली अंकिता?
“मी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगू इच्छिते की तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलंत, तो सूरज बाहेर आल्यावर तसा नाहीये. तो गणपतीच्या मूर्तीच्या मातीसारखा आहे. त्याला जसा आकार द्याल तसा तो घडेल. तो स्वत:चं मत मांडत नाही. त्याच्या आजूबाजूचे लोक चुकीच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत. कारण ते त्यांच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत. मला जेवढं शक्य होईल, तेवढं माझं सूरजवर लक्ष राहील, पण या दलदलीत मला पडायचं नाही. माझ्याकडे माझी खूप कामं आहेत. मी नको असेन तर बाजूला होईन, पण त्यासाठी एवढं सगळं करू नका. त्या मुलाला चुकीचं मार्गदर्शन करू नका. देवाने त्याला जे दिलंय, ते टिकू दे आणि वाढू दे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या जीवावर इतर सगळेजण मोठे झाले तर ते मला खूप वाईट वाटेल” असं अंकिता म्हणाली.
“सूरज हा अतिशय भोळा आहे. त्याला काहीच माहीत नाही. मी त्याच्या गावी त्याला भेटायला गेली तेव्हा दिवसभरात त्याने हातात मोबाइलसुद्धा घेतला नव्हता. त्याचा मोबाइल दुसऱ्या व्यक्तीकडे असतो, तिसरी व्यक्ती त्यावर व्हिडीओ एडिट करत असते. आता यानंतर या विषयावर मी काही बोलणार नाही,” असं अंकिताने स्पष्ट केलं. तर दुसरीकडे या वादाबद्दल समजताच सूरजने अंकिताला फोन केला. तेव्हा या दोघांमध्ये जे संभाषण झालं, त्याचाही व्हिडीओ अंकिताने युट्यूबवर पोस्ट केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List