“सलमानचे एक नाही तर 8 वन नाईट स्टँड्स…”; एक्स गर्लफ्रेंडकडून आरोप
अभिनेता सलमान खानचं खासगी आयुष्य नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतं. सलमानसोबत आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने आता त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत. सलमानला ‘वन नाईट स्टँड’चं व्यसन असल्याचं तिने म्हटलंय. इतकंच नव्हे तर त्याने शारीरिक छळ आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप एक्स गर्लफ्रेंडने केला आहे. सलमानच्या या एक्स गर्लफ्रेंडचं नाव सोमी अली आहे. 1990 मध्ये सलमान आणि सोमी अली एकमेकांना डेट करत होते. आता ‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनदरम्यान सोमीने सलमानवर अनेक आरोप केले आहेत.
नात्यात सलमानने केलेल्या फसवणुकीमुळे त्याच्याशी ब्रेकअप केल्याचा खुलासा सोमीने केला आहे. एका युजरने सोमीला तिच्या ब्रेकअपमागील कारण विचारलं होतं. त्यावर उत्तर देताना तिने लिहिलं, “कारण मी सलमानच्या एक नाही तर आठ नाईट स्टँड्सना वैतागले होते. त्याचसोबत दररोज तो मला शिवीगाळ आणि मारहाण करायचा.” या सेशनदरम्यान सोमी अलीला ऐश्वर्या रायबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “ऐश्वर्या ही खूप चांगली आहे आणि सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिच्यासोबत जे झालं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं.”
या सेशनदरम्यान सोमी बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डबद्दलही व्यक्त झाली. “लॉरेन्स बिष्णोई हा बॉलिवूडचा दाऊद आहे”, असं ती म्हणाली. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईकडून सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. बॉलिवूडच्या अंडरवर्ल्डचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारणाऱ्याला सोमी म्हणाली, “मी माणुसकीची सर्वांत वाईट छटा पाहिली, मी सर्वांत चांगल्या गोष्टीही पाहिल्या आहेत. मला धमक्याही मिळाल्या आहेत आणि मौन बाळगण्यासाठी मला रग्गड पैशांचीही ऑफर मिळाली आहे.”
सोमी अली ही सलमान खानला जवळपास आठ वर्षे डेट करत होती. सोमी अलीसोबतच्या नात्यामुळेच संगीता बिजलानीने सलमानसोबत लग्न मोडल्याचं म्हटलं जातं. सलमान आणि सोमीचं नातंही विविध कारणांमुळे चर्चेत होतं. ब्रेकअपनंतर सोमीने सलमानवर बरेच गंभीर आरोप केले. त्याने माझा छळ केला, असंही सोमीने म्हटलं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List