बोगस भरारी पथकांच्या नाकाबंदीने आणला नाकात दम, नाक्यानाक्यांवर तपासणीच्या नावाखाली सामान्यांची लूटमार
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून तपासणीसाठी नाक्यानाक्यावर निवडणूक आयोगाची भरारी पथके तैनात आहेत. धक्कादायक म्हणजे यात काही तोतया अधिकाऱ्यांची पथके घुसली असून नाकाबंदीच्या नावाखाली या तोतयांनी सामान्यांच्या नाकात दम आणला आहे. या नाकाबंदीत महिलांना टार्गेट करून नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी असून या बोगस नाकाबंदीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. सर्वत्र खरेदीचा जोर आहे. असे असताना नाहक तपासणीचा जाच करून गृहिणी आणि सामान्यांना त्रास दिला जात आहे. त्यातून नाक्यानाक्यांवर खटके उडताना दिसत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात खरंच अधिकृतपणे तपासणी केली जाते का, याबाबतही शंका घेतली जात आहे.
भरारी पथकांचीच तपासणी व्हावी
भरारी पथकांबाबतची साशंकता दूर करण्यासाठी आणि तोतया पथकांचा पर्दाफाश होण्यासाठी या पथकांसाठीचे नियम कठोर केले जावेत, अशी मागणी होत आहे. संबंधित पथकातील अधिकाऱ्यांचे आधारकार्ड, ओळखपत्र, नियुक्तीपत्र तपासणीदरम्यान दाखवण्याची सक्ती केली जावी, असेही सामान्यांचे म्हणणे आहे.
गृहोपयोगी सामान आणि पर्सचीही तपासणी
तपास पथकांकडून लुटमार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. आम्ही गृहोपयोगी सामानाची खरेदी केली तेही नाकाबंदीत तपासण्यात आले. आमच्याकडील पर्सचीही झडती घेण्यात आली. नाहक तास दीड तास थांबवून प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. ओळखपत्र दाखवण्याची सक्ती केली गेली. कारवाईची धमकी देऊन कोणतीही पावती न करता आमच्याकडून पैसे उकळण्यात आले, असे एका महिलेने सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List