लोकांना स्पष्टीकरण देण्यासाठी माझा जन्म..; वर्षा उसगांवकरांसोबतच्या भांडणांबद्दल काय म्हणाली निक्की?
अभिनेत्री निक्की तांबोळीने ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सिझन चांगलंच गाजवलं. या सिझनमध्ये ती टॉप 5 स्पर्धकांपर्यंत पोहोचली होती. मात्र बिग बॉसची ट्रॉफी पटकावण्यापासून ती हुकली. हा सिझन संपल्यानंतर निक्की विविध मुलाखतींमध्ये बिग बॉसच्या घरातील तिच्या प्रवासाविषयी मोकळेपणे व्यक्त होत आहे. बिग बॉसच्या घरात निक्की दोन कारणांमुळे विशेष चर्चेत राहिली. यापैकी पहिलं कारण म्हणजे तिची आणि अरबाज पटेलची जवळीक आणि दुसरं कारण म्हणजे वर्षा उसगांवकर यांच्याशी तिची झालेली भांडणं. या मुलाखतीत निक्कीने वर्षा यांच्यासोबत झालेल्या भांडणांविषयी खंत बोलून दाखवली.
“मी बिग बॉसच्या घरात वर्षाताईंसोबत उद्धटपणे बोलले, याची मला खंत वाटते. पण तिथे मी त्यांची माफीसुद्धा मागितली आणि त्यांनी मला माफसुद्धा केलं होतं. बिग बॉसची ट्रॉफी कोणीची उचलली तरी मला तो शो गाजवायचा होता आणि मी तेच केलं”, असं निक्की म्हणाली. तू वर्षा उसगांवकरांबद्दल कधीच ऐकलं नव्हतंस का, असा प्रश्न निक्कीला पुढे विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “मी खरंच त्यांच्याबद्दल कधी ऐकलं नव्हतं. यात लपवण्यासारखं किंवा खोटं बोलण्यासारखं काहीच नाही. मी त्यांना ओळखते असं बोलून लोकांची सहानुभूत घ्यायची किंवा मी त्यांना ओळखत नाही असं बोलून त्यांचा द्वेष पत्करायचा याचा मी विचारत केला नव्हता. खरं बोलायचं झालं तर बिग बॉसच्या घरात मी कोणालाच ओळखत नव्हते. माझ्यासाठी ते एक नवीन कुटुंब होतं. नंतर जेव्हा घरात हळूहळू इतर सेलिब्रिटी येऊ लागले आणि त्यांच्याबद्दल कौतुक करू लागले, बोलू लागले तेव्हा मला समजलं की त्या खूप मोठ्या अभिनेत्री आहेत.”
बिग बॉसच्या घरात निक्कीने जेव्हा कधी वर्षाताईंशी भांडणं केलं, त्यानंतर तिने त्यांचा माफीसुद्धा मागितली. मात्र आधी भांडण करून नंतर माफी मागायची तुझी स्ट्रॅटेजीच आहे, असं वर्षा यांनी सुनावलं होतं. त्यावर बोलताना निक्की म्हणाली, “प्रत्येकाला स्पष्टीकरण देण्यासाठी माझा जन्म झाला नाही. मी किती खरी आहे, किती खोटी आहे हे मी स्पष्ट करत बसणार नाही. मी कोणालाही उत्तर द्यायला बांधिल नाही. तरी मी वर्षाताईंची मनापासून माफी मागितली होती. आता त्यांना ते कितपत खरं किंवा खोटं वाटतं हे त्यांच्यावर अवलंबून आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी मला सोशल मीडियावर फॉलो केलंय. मी सुद्धा त्यांना फॉलो केलं.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List