आठ हजार डॉलर देईन, माझ्यासोबत राहा; खान कुटुंबातील पूर्व सुनेला 100 वर्षीय वृद्धाची ऑफर
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘फॅब्युलस लाइव्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्स’ या शोचा तिसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. करण जोहर निर्मित या शोमध्ये बॉलिवूडमधील हाय-प्रोफाइल सेलिब्रिटी पत्नी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि इतरही बऱ्याच विषयांवर मोकळेपणे गप्पा मारताना दिसतात. यामध्ये महीप कपूर, नीलम कोठारी, भावना पांडे आणि सीमा सजदेह यांचा समावेश आहे. यंदाच्या सिझनमध्ये तीन नवीन चेहरेसुद्धा सहभागी झाले आहेत. त्यात रिद्धिमा कपूर साहनी, शालिनी पास्सी आणि कल्याणी साहा चावला यांचा समावेश आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये अभिनेता सोहैल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेहने तिच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला आहे. एका 100 वर्षीय वृद्ध व्यक्तीने मेसेज केल्याचा खुलासा सीमाने केला आहे.
इन्स्टाग्रामवरील डायरेक्ट मेसेजमध्ये (DM) तुला आतापर्यंत आलेला सर्वांच विचित्र मेसेज कोणता, असा प्रश्न सीमाला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सीमाने हा किस्सा सांगितला. “तो मला एक महिन्यासाठी त्याची एस्कॉर्ट म्हणून ठेवायला तयार होता. त्याने मला एक महिन्याचा बजेटसुद्धा दिला होता. आश्चर्याची बाब म्हणजे तो 100 वर्षांचा म्हातारा होता. हा अनुभव खूपच भयानक होता. तुला माझ्यासोबत ठेवायला मला आवडेल, असा मेसेज त्याने केला होता. माझ्यासोबत राहा, तुला इतका बजेट देईन, असं त्याने लिहिलं होतं. त्याचा बजेट जवळपास 7 ते 8 हजार डॉलर होता. मी जेव्हा त्याचा चेहरा पाहिला तेव्हा मला जणू हार्ट अटॅकच आला होता”, असं ती म्हणाली.
सीमाचा हा किस्सा ऐकून महीप कपूरने थक्क होऊन तिला विचारलं की, “खरंच तो तुला सात हजार डॉलर द्यायला तयार होता का?” त्यावर सीमा तिला म्हणते, “महीप, मी त्याच्याशी फार काही चॅट केलं नव्हतं. त्याने मला असा मेसेज केला होता, मी तो फक्त वाचला होता.” इन्स्टाग्रामवरील ‘डीएम’मधील सर्वांत विचित्र मेसेजचा प्रश्न जेव्हा नीलम कोठारीला विचारण्यात आला, तेव्हा तिने उत्तर दिलं की, “मला एकाने विचारलं की मी गे आहे का?”
गेल्या वर्षी सोहैलने पत्नी सीमा सजदेहला घटस्फोट दिला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांना दोन मुलं आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List