सृजन संवाद- हनुमंताचा ठोसा

सृजन संवाद-  हनुमंताचा ठोसा

>> डॉ. समीरा गुजर जोशी

सुंदरकांड रामायणाचे एक वैशिष्टय़पूर्ण कांड आहे. सर्व कांडांमध्ये राम नायक म्हणून केंद्रस्थानी आहे, पण हनुमंत केंद्रस्थानी असलेलं असं हे सुंदरकांड आहे. स्वतंत्रपणेसुद्धा सुंदरकांडाचे वाचन अनेक जण श्रद्धेने करतात. त्याच्या धार्मिक प्रसिद्धीबरोबरच रावणाच्या लंकेची माहिती देणारं असं हे कांड खूप रंजकही आहे. त्यातलाच हा एक प्रसंग.

अनेक अडथळे पार करून हनुमंत रावणाच्या लंकेत पोहोचला आहे. लंकेचे वैभव बघून आणि खास करून तिथल्या सैन्याची ताकद बघून तो भारावून गेला आहे. अशा लंकेच्या सामर्थ्यापुढे आपल्या वानर सेनेचा निभाव कसा लागणार आणि रामही कितीही पराक्रमी असला तरी रावणापुढे कसा टिकू शकेल, असे प्रश्न त्याला लंकेच्या प्रथम दर्शनानंतर पडू लागले. कुठेतरी त्याचा विश्वास डळमळू लागला. या अशा प्रचंड नगरीत खुलेपणाने आत शिरणे शक्यच नव्हते. सीतेचा शोध घ्यायचा तो लपछपत घेणे भाग होते. कुणाच्याही दृष्टीस न पडता आज शिरायचे. सीतेला शोधायचे आणि तसेच गुपचूप निघून जायचे अशी योजना हनुमंताने मनाशी आखली. त्या दृष्टीने योग्य संधीची वाट बघत तो लंकेच्या प्रवेशद्वाराशी उभा राहिला. इतक्यात साक्षात लंका नगरीच एका राक्षसीचे रूप घेऊन वायुपुत्र हनुमान पुढे उभी राहिली.

तिने एकदम आक्रमक पवित्राच घेतला, त्याला ताकीद देत तिने म्हटले, ‘‘तू अजून जिवंत आहेस तोवरच तू कोण आहेस हे मला सांग. कारण रावणाचे सैन्य रक्षण करत आहेत अशा लंकेमध्ये तुझा प्रवेश होणे खरोखरच शक्य नाही. त्या आधीच तू पकडला जाशील.’’ खरे तर लपून राहायचे असे हनुमंताने ठरवले होते, पण आता कोणीतरी अशा प्रकारे समोर आल्यावर व्यक्त होण्याशिवाय पर्याय नव्हता. हनुमंताने तिलाच उलटा प्रश्न केला, “तू जे काही मला विचारते आहेस ते मी तुला सांगतो, पण या नगरीच्या द्वाराशी उभी राहिलेली तू कोण आहेस ते तू मला आधी सांग.’’

लंका नगरीने त्याला स्वतची ओळख सांगितली. आपली ओळख सांगत असताना ती त्याला अतिशय रागावून म्हणाली, “मी कोण आहे हे चांगले ध्यानात घे. रावणाच्या आज्ञेने या प्रवेशद्वाराचे मी रक्षण करते आहे. मी स्वतच अजिंक्य अशी लंका नगरी. माझ्या आज्ञेशिवाय तुला आत प्रवेश करता येणार नाही.’’ गुप्तपणे ज्या नगरीत प्रवेश करायचा ती नगरीच अशा प्रकारे राक्षसी रूपात स्वत समोर उभी ठाकलेली पाहून हनुमंताने हुशारीने तिच्याशी नम्रतेने बोलणे सुरू केले. “लंकेचे कौतुक ऐकून येथील उद्याने, प्रसाद वगैरे पाहण्यासाठी मी आलो आहे. माझ्या मनात या नगरीविषयी कुतूहल आहे. मी बापडा आत जाईन, नगरीचे सौंदर्य पाहीन आणि तृप्त होऊन आल्या पावली परत जाईन. माझा कोणाला काहीही उपद्रव होणार नाही. तेव्हा मला आज जायची परवानगी द्यावी.’’ आपल्यासमोर राक्षसी असली तरी एक स्त्राr उभी आहे. त्यामुळे सामोपचाराने आपले बोलणे ऐकून ती आपल्याला आत सोडेल अशी हनुमंताची भूमिका होती, पण त्याला आश्चर्याचा धक्का बसला. लंका नगरीने अचानक त्याला चपराक दिली.

अशा प्रकारे अचानक हल्ला झाल्यावर त्यालाही प्रतिकार करणे भाग होते. तरीही ही स्त्राr आहे याचे भान ठेवून त्याने फार जोराचा नाही तरी एक तडाखा लगावलाच. या उल्लेखांमध्ये एक बारकावा वाल्मिकी मुनींनी सांगितला आहे. तो म्हणजे हनुमंताने आपला डावा हात उचलला. म्हणजे हनुमंत डावखुरा असावा. (कारण अचानक झालेल्या हल्ल्याला उत्तर देताना आपण सहसा आपला क्रियाशील हातच उचलणार किंवा त्याच्या दोन्ही हातांमध्ये सारखीच ताकद असावी. त्याची द्रोणागिरी पर्वत उचललेली मुद्रा पाहिली तर अनेक ठिकाणी उजव्या हातात गदा आणि डाव्या हातात द्रोणागिरी पर्वत दिसतो.) हनुमंताचा हा इवलासा ठोसाही लंकेसाठी पुरेसा होता. त्यानेच ती विव्हळत जमिनीवर पडली.

त्यानंतर तिने जर सांगितले ते आश्चर्यकारक आहे. तिने असे सांगितले की, मला सांगण्यात आलं होतं की, ही जी लंका नगरी आहे तिचा विनाश वानरांकडून होणार आहे. रावणाने सीतेला पळवून आणून जणू काही राक्षसांचा विनाश ओढवून घेतला आहे, तेव्हा तुला सीतेला शोधायला जायचं असेल तर जा.

यावरून लक्षात येते की, रावणाच्या गुप्तहेर खात्यानेही रामाच्या हालचालींचा वेध घेतला असावा. म्हणूनच वानर सैन्याची कुणकुण लंकेपर्यंत पोहोचली असावी. रावणाने सीतेला पळवले ही गोष्ट लंकावासीयांना भावलेली नाही हेही यावरून लक्षात येते. आपला विनाश ओढवला आहे अशीच लंकावासीयांची प्रतिक्रिया दिसते. त्याचप्रमाणे हेही लक्षात येते की, सीता कुठे आहे हे साक्षात लंकेलाही माहिती नाही. म्हणूनच तुला तिचा शोध घ्यायला जायचे असेल तिथे जा असे ती म्हणत असावी. हनुमंताचे मनोबल लंका पाहिल्यानंतर कुठेतरी किंचित खालावले असेल, पण लंकेच्या या भेटीनंतर ते नक्कीच उंचावले आहे. कारण आपण ज्या लंकेची धास्ती घेत आहोत, ती लंकाही आपल्या येण्यामुळे भयभीत झाली आहे हे या प्रसंगातून त्याच्या लक्षात आले.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुतीच्या जागावाटपाबाबत 5 तास ‘वर्षा’वर खलबतं; निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर घडामोडींना वेग महायुतीच्या जागावाटपाबाबत 5 तास ‘वर्षा’वर खलबतं; निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर घडामोडींना वेग
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीची काल रात्री बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 29 सप्टेंबर ते शनिवार 5 ऑक्टोबर 2024
कोलकातामधील महिला डॉक्टरची निर्घृण हत्या- आरोपी संदीप घोषला मृत्युदंडाची शिक्षा अटळ, विशेष न्यायालयाने नोंदवले निरीक्षण; जामीन फेटाळला
मुंबई विभाग क्र. 12 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर
ऑक्टोबर महिन्यात  सुट्ट्याच सुट्ट्या
अफगाणिस्तानात महिलांसोबत भेदभाव नाही, तालिबानने हॉलिवूड अभिनेत्रीचा दावा फेटाळला
हिजबुल्लाच्या म्होरक्याचा खात्मा!